वाराणसी या आपल्या मतदारसंघातल्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी करोनामुळे झालेल्या मृत्यूंविषयी बोलताना पंतप्रधान भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावरून आता विरोधकांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे. ‘मोदी राजकारणात नसते, तर चित्रपटांमध्ये असते’, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावनिक होण्यावर निशाणा साधण्यात आला आहे. “गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली?”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून मोदींवर टीका करणारी पोस्ट करण्यात आली आहे.

मोदींनी दखल घेतली ही समाधानाची बाब, पण…

दरम्यान या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना गेल्या दोन महिन्यात झालेल्या करोना मृत्यूंची आकडेवारी देण्यात आली आहे. “कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दखल माननीय पंतप्रधानांनी घेतली, ही समाधानाची बाब आहे. मात्र दि. १ मार्च २०२१ रोजी हसतमुखाने लस घेतल्यानंतर मा. पंतप्रधानांनी मागच्या दोन महिन्यात काय उपाययोजना केल्या? याबाबतही त्यांनी देशाला माहिती द्यायला हवी. १ मार्च २०२१ रोजी भारतातील कोरोनामुळे झालेले मृत्यू १ लाख ५७ हजार २८६ एवढे होते. हा मृत्यूचा आकडा २० मे २०२१ रोजी २ लाख ९१ हजार ३६६ वर पोहोचला. मधल्या अडीच महिन्यात जवळपास १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची नोंद झाली. गंगा शववाहिनी झाली. देशभर स्मशानासाठीही रांगा लावून कूपन घेण्याची वेळ आली”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नाहीतर ‘अ‍ॅक्टर मोदी’सारखा हॅशटॅग पुन्हा…

दरम्यान, या पोस्टमध्ये आरोग्य सुविधांसंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका देखील करण्यात आली आहे. “मागच्या वर्षभरात जेवढ्या मृत्यूंची नोंद झाली होती, जवळपास तेवढ्याच मृत्यूंची नोंद दुर्दैवाने मागच्या अडीच महिन्यात झाली. पंतप्रधानांनी नक्कीच अश्रू ढाळावेत. पण या अडीच महिन्यात लोकांना व्हॅक्सिन, ऑक्सिजन आणि औषधे का मिळाली नाहीत? याचेही उत्तर जनतेला द्यावे लागेल. नाहीतर हकनाक ‘ॲक्टर मोदी’ सारखा हॅशटॅग पुन्हा पुन्हा ट्रेंडिंगला येत राहील”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १ मार्च २०२१ रोजी लस घेतानाचा आणि आज २१ मे रोजी भावनिक झालेला असे दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

…आणि मोदी भावुक झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असून उपाययोजनांची माहिती घेत आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांना भावना अनावर झाल्या. “या व्हायरसने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिलेले दिसून आले.

काँग्रेसनं लागलीच यावरून मोदींवर टीका केली. “जे लोक साहेबांना गुजरातच्या दिवसांपासून ओळखतात ते सांगतात की, साहेब राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये नक्कीच असते. ते तिथे न गेल्याने चित्रपटांचा फायदा झाला पण, देशाचे नुकसान झालं,” असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.