भारतीय जनता पक्षाचे सरकार बहुमताचे असेल. अधिवेशनादरम्यान ते सिद्ध करू. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा मागितला नव्हता. त्यांनी तो देऊ केला आहे, त्यामुळे तो घेऊ, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी औरंगाबाद येथे सांगितले. एका बाजूला राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ असे सांगतानाच शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आमच्याबरोबर येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
 भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त खडसे रविवारी औरंगाबाद येथे आले होते. त्यांनी मराठवाडय़ातील पीक पाण्याचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. निवडणुकीदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप विसरून शिवसेनेला बरोबर घेण्याचे ठरविण्यात आले. मान-अपमानाचा विषय न करता महाराष्ट्र सरकारला स्थिरता यावी म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचेही ठरले. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने बरोबर यावे, असे आम्हाला वाटते. आमची पुढे जायची तयारी आहे. त्यांनी केंद्र आणि राज्याच्या विस्तारात सहभागी व्हावे, असे वाटते. आम्ही अनुकूल आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आशावादीच राहू, असे ते म्हणाले. हे सरकार अल्पमतात चालेल का, असे विचारले असता ते म्हणाले, सरकार बहुमताचे असेल. येत्या १२ नोव्हेंबरला ते सिद्ध होईल. अल्पमताचे सरकार असेल का, या प्रश्नावर काहीशी चिडचिड करत उत्तर देताना खडसे यांनी बहुमत सिद्ध करू, असे सांगितले. शिवाय राष्ट्रवादीचा पाठिंबाही घेऊ, असे ते म्हणाले.
मराठवाडय़ात दुष्काळी स्थिती
 मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्य़ातील पीक स्थितीचा आढावा घेतल्याचे सांगत खडसे म्हणाले,की पीक कापणीच्या प्रयोगानंतर येणाऱ्या पैसेवारीच्या आधारे दुष्काळजन्य स्थिती जाहीर केली जाईल. ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पैसेवारी असल्याची स्थिती आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. आकडेवारी आल्यानंतर निर्णय घेऊ. जालना, नांदेड या शहरात पुरेसे पाणी उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी टँकर लावावे लागतील. जानेवारीनंतर टँकरच्या संख्येत वाढ होईल.