महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारचा दिवस गाजवला तो शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांनी. सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयात भेट देण्यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवारांवरही गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरातून विरोधीपक्ष सरकारवर टीकेची झोड उठवत होते. शुक्रवारी शरद पवार ईडी कार्यालयात जाणार असल्यामुळे राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत होते. याशिवाय महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या भागांमध्ये बंदही पाळण्यात आला. यानंतर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवार यांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेत, ईडी कार्यालयात न जाण्याचं आवाहन केलं.

यावर शरद पवार यांनी आपल्या सहकारी नेत्यांशी चर्चा करत ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय केला. दिवसभर चाललेल्या या घडामोडींवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. शरद पवार जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी इव्हेंट करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. पाटलांच्या या टीकेला शरद पवार यांनी आपल्या पुण्यातील पत्रकार परिषदेत खरमरीत उत्तर दिलं. “ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार. काही गोष्टी या अपघाताने होत असतात”, असं म्हणत शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला दिला.

अवश्य वाचा – अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ

दरम्यान अजित पवार यांनी आपल्या आमदराकीचा राजीनामा का दिला याची मला माहिती नाही. अजित पवारांच्या चिरंजीवाशी चर्चा केल्यानंतर, ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाल्याचं शरद पवारांनी उपस्थित पत्रकारांना सांगितलं. त्यामुळे त्यांची भेट घेतल्यानंतर या विषयी सविस्तर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.