महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संवाद साधत आहेत. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला.

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिले. या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या कार्यक्रमात घेतला जात आहे.

आगामी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशा सहा पक्षांचे प्रमुख नेते या उपक्रमातील वेबसंवादात आपले विचार मांडतील. ३१ मेपासून ५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता होणाºया या वेबसंवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे भूमिका मांडणार आहेत. समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल.

-: वेळापत्रक :-
३१ मे: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे
१ जून: मनसेचे प्रमुख राज ठाकरे
२ जून: वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
३ जून: काँग्रेसतर्फे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
४ जून: विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
५ जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रायोजक
* प्रस्तुती : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
* सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.