अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून भाजपाला साथ देणाऱ्या १८ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. १८ नगरसेवकांशिवाय जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीत पक्षादेशाचा भंग होत असताना त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल अहमदनगर शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर खात्यावरून ही माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्या १८ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण त्यांना समाधानकारक उत्तर न देण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये अहमदनगरमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. अहमदनगरमध्ये एकूण ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ चे संख्याबळ आवश्यक होते. निवडणुकीत शिवसेना २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ व अपक्ष २ असे संख्याबळ होते. भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात तिहेरी लढत होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले.