नगर : महापौर निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोनच महिन्यात मागे घेतले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आज, सोमवारी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत तशी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन बेरजेच्या राजकारणासाठी निलंबित नगरसेवकांना पक्षाचे काम करण्यास परवानगी देत असल्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले. निलंबन मागे घेतल्यानंतर भाजपचा पाठिंबा काढणार का, या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी हा विषय लोकसभा निवडणुकीनंतर हाताळला जाईल, असे पत्रकारांना स्पष्ट केले.

खा. पवार व आ. पाटील यांच्या उपस्थितीत नगर मतदारसंघाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्यात नगर शहराचा आढावा घेताना आ. पाटील यांनी निलंबन मागे घेत असल्याचे सांगितले. पवार यांच्या सूचनेनुसार पाटील यांनी दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्याने, काँग्रेस परवानगी देणार असेल तर निलंबन मागे घेतले जाईल, असे सांगत उपस्थित आ. डॉ. सुधीर तांबे यांची परवानगी मागितली, डॉ. तांबे यांनी परवानगी दिल्यानंतर पाटील यांनी तसे जाहीर केले. तत्पूर्वी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली. या वेळी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. जितेंद्र आव्हाड, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, काँग्रेसचे शिर्डीतील उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले,की महापालिकेत आपल्याला फटका बसला तरी यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला बेरजेच्या राजकारणाची शिकवण दिली आहे, राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली होती. पक्षातून काढले तरी हे नगरसेवक मला भेटले होते व त्यांनी आम्ही पक्षाचेच काम करणार असल्याचे सांगितले होते.

राजकारणात मागे-पुढे करण्याची तयारी हवी, भूमिकेत काही सुधारणा होत असेल तर सर्वाना बरोबर घेतले पाहिजे, नगरसेवकांनी पक्षाचे काम करण्याची लेखी परवानगी मागितली होती, आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळाल्याचा त्यांना आनंदही झाला होता, त्यामुळे त्यांना पक्षात काम करण्यास परवानगी दिली जात आहे.

राष्ट्रवादीतील अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, याकडे पत्रकारांनी पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,की ज्यांना जनाधार नाही, आम्ही नाकारले, असेच भाजपमध्ये जात आहेत. पाच वर्षे सत्ता असूनही भाजपला उमेदवार मिळत नाहीत, त्यामुळे भाजप ही कमजोर पार्टी आहे, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी ‘भ्रष्टाचारवादी पार्टी’ आहे, असा आरोप केला, त्याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, मी पूर्वी भाजपवर ‘इव्हेंट मॅनेजमेंट पार्टी’ असल्याचा आरोप केला होता, तो त्यांना लागलेला दिसतो. पाच वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती, मात्र त्यांना आमच्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत आणि आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही त्यांनी काही केले नाही. पाच वर्षे केवळ लोकांची दिशाभूल केली.