पालघरमधील झुंडबळी प्रकरणाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झालं. मुलं पळवणारी टोळी गावात दाखल झाल्याच्या संशयावरून जमावाकडून तीन साधूंची अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती. या घटनेच्यावर्षपूर्तीनिमित्त भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं. भाजपा आमदार राम कदम यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन केलं. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टोला लगावला आहे.

“करून करून भागले आणि देवधर्माला लागले मराठीतली ही म्हण भाजपाच्या ‘चमको’ नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी,” अशा शब्दांत राष्ट्रवादीने राम कदम यांना ट्विट करत सुनावलं आहे.

“राम कदम यांच्याकडून पुन्हा एकदा पालघर घटनेवरुन राजकारण करणं हे त्यांच्या अपयशाचं प्रतीक आहे. करोना संकटाचं त्यांना कोणतंही गांभीर्य नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा!

सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली – प्रवीण दरेकर
“पालघर साधू हत्याकांडानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी न्याय मिळू शकला नाही. हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ ‘सत्ते’ साठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी,” अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

“सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. हिंदुत्वाच्या आचार-विचारांची कास धरत हिंदुत्वाचे तेजस्वी रूप हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते, त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं व सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

“राज्यात साधु, संतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा, महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील, जोपर्यंत या हत्याकांडातील दोषींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला जाब विचारत राहू,” असंही दरेकर यांनी सांगितले.