परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे विजय भांबळे, तर शिवसेनेकडून आमदार संजय जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यात लढतीचे स्वरूपही जवळपास स्पष्ट झाले आहे. तरीही तिसरा उमेदवार कोण, यावरही लढतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. परभणी लोकसभेत शिवसेनेला मिळणारे यश केवळ सेनेचे नाही, तर काँग्रेसचाही ‘हात’ धनुष्यबाणासाठी सक्रिय असतो, हासुद्धा इतिहास आहे.
दोन्ही पक्षांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. दोघांनाही ही निवडणूक सोपी नाही, हेसुद्धा या निमित्ताने स्पष्ट झाले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे. पराभवाची ‘हॅटट्रीक’ सुरेश वरपूडकर यांनी केली. अशा स्थितीत राष्ट्रवादीला ‘विजय’ मिळवून देण्यासाठी पक्षाला मोठे परिश्रम करावे लागणार आहेत. भांबळे यांना पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. वरपूडकर हे भांबळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाखूश आहेत. अशा वेळी वरपूडकरांच्या कार्यकर्त्यांची फौज भांबळे यांच्यासाठी झटणार नाही, ही बाब स्पष्ट आहे. अर्थात, उमेदवार भांबळे यांनाही याची कल्पना असणार.
आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे भांबळे यांचे कट्टर राजकीय विरोधक. दुसरीकडे वरपूडकरांचे व भांबळे यांचे पक्षांतर्गत वैर आहे. शिवसेनेला या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. आमदार जाधव यांना वरपुडकर-बोर्डीकर यांच्या मदतीतून विजय सुकर होईल, असे वाटले तर त्यात गर मानता येणार नाही. खरे तर, सेनेसाठीसुद्धा ही निवडणूक आव्हानात्मक आहे. या मतदारसंघात सेनेचा उमेदवार निवडून आल्यानंतर तो पक्षद्रोह करतो, हा इतिहास आहे. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे यांचीच री गणेश दुधगावकरांनी पुढे ओढली. ज्या उमेदवाराला सेनेचा मतदार मत देतो तो उमेदवार पुढे काय करतो, असा प्रश्न आहे. आपण जो खासदार निवडतो तो सतत आपल्या मताशी प्रतारणा करतो, असे शिवसेनेच्या परंपरागत मतदाराला वाटले तर ते चूक नाही. अशा वेळी मतदारांच्या विश्वासार्हतेला पात्र ठरण्याची मोठी कसोटी सेनेच्या उमेदवाराला पार करावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जसा पराभवाचा, तसाच सेनेला गद्दारीचा इतिहास आहे. दोन्ही उमेदवारांसमोरची आव्हाने आपल्या परंपरांना खोटे ठरवणे हीच आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत थेट लढत फारशी झाली नाही. बऱ्याचदा तिसरा उमेदवार कोण यावरही लढतीचे स्वरूप ठरते. परभणीत अजून तिसऱ्या उमेदवाराची घोषणा व्हायची बाकी आहे. गेल्या निवडणुकीत दुधगावकर विरुद्ध वरपूडकर असा सामना झाला, त्यात बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार राजश्री जामगे यांनी निर्णायक मते घेतली. जे मताधिक्य दुधगावकरांना होते तेवढीच मते जामगे यांना होती. वरपूडकरांच्या मतांचे विभाजन बसपने केले. सरळ लढतीपेक्षा मते विभागण्यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. भांबळे यांचे पक्षांतर्गत विरोधक आता भांबळे यांच्या मार्गात असे काही अडथळे निर्माण करता येऊ शकतात काय, या कल्पनेत सध्या दंग आहेत. भांबळे यांना उमेदवारी तर मिळालीच, पण सहजासहजी ही निवडणूक होऊ नये, सरळ लढत होऊ नये, तिसरा उमेदवार निर्णायक मते घेणारा असावा अशी कदाचीत योजना आखली जाण्याची शक्यता आहे.
सेनेला जिल्ह्यात जे राजकीय यश मिळते ते निभ्रेळ असे शिवसेनेचेच नाही. विधानसभेला काँग्रेसच्या विरोधात जो उमेदवार शिवसेनेचा असतो, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस मदत करते आणि लोकसभेला सेनेच्या उमेदवाराला आतून काँग्रेसची रसद असते. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी सगळी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत एकवटते. मोठे नेतेच नाही, तर दुसऱ्या फळीचे कार्यकत्रेही निवडणुकीत ‘हाती’ धनुष्यबाण घेतात. सेनेच्या राजकीय यशात अशा पक्षनिरपेक्ष सहकार्याचे योगदान मोठे आहे. या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सरळ लढतीचे चित्र वरकरणी उभे केले जात असले, तरीही तिसरा उमेदवार कोण? या प्रश्नाचा उलगडा अजून झाला नाही. तिसरा उमेदवार घोषित झाल्यानंतर बरेच चित्र स्पष्ट होऊ शकते.