लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखाही जाहीर होतील. अशात सत्ताधारी भाजपावर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर एक व्यंगचित्र ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपाचे राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

व्यंगचित्रात शिवाजी महाराजांचा एक किल्ला दाखवण्यात आला आहे. तसेर मोदी आणि अमित शाह या दोघांनाही दाखवण्यात आले आहे. मोदी विचारत आहे की गेल्यावळी तर आपण छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून मतं मागितली, त्यावर अमित शाह विचारत आहेत की यावेळी काय करूयात? या व्यंगचित्रात मोदींनी शिवाजी महाराजांच्या नावाचं सोयीस्करपणे नाटक केले हेच जयंत पाटील यांना सुचवायचे आहे. त्याचमुळे त्यांनी व्यंगचित्रातून भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाने 2014 मध्ये सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला होता. मात्र मागील पाच वर्षात इतर पक्षांनीही डिजिटली ‘करेक्ट’ रहात भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीचे ट्विटरवरचे जवाब दो आंदोलन असेल किंवा व्यंगचित्र असतील तीही अशा प्रकारे टीका करण्याचाच एक भाग आहेत यात शंका नाही. आता भाजपा या व्यंगचित्राला कसं उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. मंगळवारी शिवजयंती आहे, या निमित्ताने राष्ट्रवादीने एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे.