राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात राज्यभरात हल्लाबोल आंदोलन पुकारलं आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने फक्त आश्वासनं दिली. मात्र ती पूर्ण न करत जनतेची फसवणूक केलेली आहे. सरकारबद्दल नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न समोर मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केले. सोशल मीडियावरही राष्ट्रवादी काँग्रेस सतत आपल्या आंदोलनाचं अपडेट देत असतं. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून #हल्लाबोल हा हॅशटॅगही वापरत आहे. मात्र या हॅशटॅगमुळे त्यांचीच फजिती होताना दिसत आहे. कारण आयपीएल सुरु झाल्यापासून हा हॅशटॅग ट्विटरकडून राजस्थान रॉयल्स संघाला देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आपल्या ट्विटमध्ये #हल्लाबोल हॅशटॅग वापरताना राजस्थान रॉयल्सचे प्रमोशन होतानाचे चित्र दिसत आहेत. हॅशटॅगनंतर संघाचा लोगो इन्मोजी म्हणून दिसत असतानाही हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. मात्र यामुळे सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली जात असून, हे आंदोलन जनतेसाठी आहे की राजस्थान रॉयल्स संघासाठी असं विचारलं जात आहे.

 

सध्या आयपीएल हंगाम सुरु असल्याने ट्विटरवर रोज वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असतात. प्रत्येक संघाचा एक विशिष्ट हॅशटॅग आहे. राजस्थान रॉयल्सही आपल्या प्रत्येक ट्विटला #हल्लाबोल हा हॅशटॅग वापरतं. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच हल्लाबोल ही त्यांची टॅगलाइन राहिली आहे. शिल्पा शेट्टीने हल्लाबोल गाणंही शूट केलं होतं.