राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपाने सत्तेत आहेत. मात्र, यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे वारंवार समोर आलं आहे. त्यामुळे सरकार किती काळ टिकेल याबाबत वारंवार चर्चा झडत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांमधली धुसफूस समोर आली आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला संपवण्याचं काम सुरु असल्याचा आरोप काँग्रेसमधून होऊ लागला आहे. याबाबत मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी यांना याबाबत सविस्तर पत्र लिहिले आहे.

विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “पक्षाला महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट पाडलं जात आहे. सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करत आहे. एक वर्षानंतरही काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षचं सरकार चालवण्याचं काम करत आहेत.” मुंबई मिररने याबाबत वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- पोलीस खात्याच्या कारभारात ठाकरे सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळूनच…; फडणवीसांचा घणाघात

ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना पक्षासाठी तळागळातील लोकांपर्यंत काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच त्यांच्या मंत्र्यांकडे कुठलं खात आहे, हे माहिती नाही. आपल्यासोबत युतीत असलेले पक्ष हे स्वतःच्या पक्षातच मग्न असून वैचारिक रणनीती आखत आपल्या पक्षाला नाराज करत आहेत. हे थांबवण्यात काँग्रेस पक्ष कुचकामी ठरला आहे, असंही राय यांनी पत्रात म्हटलं आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानं हा देखील आरोप केला आहे की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये कोणतीही कामं झालेली नाहीत. त्याचबरोबर पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युतीधर्म पाळण्याच्या सूचना देणं हे ही गरजेचं आहे.