सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघ

आघाडीसाठी लागणारी सामंजस्याची काँग्रेसची भूमिका नसल्याने विधानपरिषदेसाठी सांगली-साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार कोणत्याही स्थितीत असेल, असे आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम गुरुवारी आपली उमेदवारी दाखल करणार असून राष्ट्रवादीच्या वतीने आ. जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना मदानात उतरले जाण्याची शक्यता आहे.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य गटातून विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली असून आज राष्ट्रवादीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या मतदार असलेल्या कार्यकर्त्यांची बठक पक्ष कार्यालयात झाली. या बठकीस माणचे शेखर गोरे हे उपस्थित होते. या बठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले, की दोन्ही जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. याशिवाय गेल्या वेळी ही जागा राष्ट्रवादीकडेच होती. एकीकडे चच्रेचे गुऱ्हाळ चालू ठेवायचे आणि जागेसाठी उमेदवारी जाहीर करायची हे काँग्रेस नेत्यांचे धोरण आघाडीस अनुकूल नाही. राष्ट्रवादी कोणत्याही स्थितीत ही जागा लढविणार आणि मोठय़ा फरकाने विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सणासुदीच्या दिवसात डाळींचे दर वाढत असल्याने सामान्य माणसाला सण साजरे करणे अवघड झाले असल्याचे सांगत शासन डाळींच्या साठेबाजावर कारवाई करण्यास कुचराई करीत असल्याने व्यापारी वर्ग सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचे ते म्हणाले. बाजारपेठेतील मालाची उपलब्धता आणि वाढते दर याचा योग्य परामर्ष घेण्यात सरकार कमी पडत असून हे भाजपा सरकारचे अपयश असल्याचेही ते म्हणाले.