सरकार देईल ना देईल मात्र, मागेल त्या गावास टँकरने पाणी देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण स्वीकारली आहे. येरळा पुनरुज्जीवन योजना माथा ते पायथा अशी राबवली जावी, अशी आपली आग्रही भूमिका असून, प्रसंगी याबाबत संघर्षांची भूमिका घेऊ अशी ग्वाही माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली. लोकसहभागातून बंधारे बांधण्याबरोबर सर्व ओढे व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण केले जावे असे आवाहन त्यांनी केले.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राजापूर येथे लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारण कामाच्या पाहणीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजापूरचे सरपंच हणमंतराव घनवट, विसापूरचे सरपंच सागर साळुंखे उपस्थित होते. राजापूर येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी नाम फाउंडेशन व पाणी फउंडेशनतर्फे ८५ हजारांचा धनादेश डॉ. अविनाश पोळ यांनी राजापूर सरपंचांकडे सुपूर्द केला. तसेच मुंबई हेल्प ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गार्डे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ १ लाख रुपये देणगी देऊन ट्रस्टच्या माध्यमातून दीड लाख रुपये खर्चाचा गाव ओढय़ावर सिमेंट बंधारा बांधण्याचे आश्वासन दिले. मुंबई येथे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या दत्ता घनवट या रिक्षा चालकाने कुटुंबासाठी राखून ठेवलेले पाच हजार जलसंधारणाच्या कामासाठी दिल्याने आमदार शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.