लोकसभा निवडणुकीतील पराभवाची समीक्षा आणि विधानसभेच्या तयारीसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकींमध्ये शरद पवारांच्या समोरच मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचे सोमवारी वृत्त प्रकाशित झाले होते. असा कोणताही राडा झाला नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिले आहे.

लोकसभेतील पराभवाची समीक्षा आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मराठवाड्यातील चार जिल्ह्याची समीक्षा सुरू होती. शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यालयांमध्ये बैठक सुरू होती. मराठवाड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावरील पोस्टवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर बाचाबाची आणि धक्काबुकी झाली. कार्यकर्त्यांचा वाद एवढा शिगेला पोहोचला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

हाणामारी किंवा राडा या पातळीवरचं कोणतीही घटना नाही, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

एका प्रथितयश न्यूज पोर्टल्सने वृत्त प्रकाशित करताना अतिरंजितपणा टाळला असता तर ते संयुक्तिक झाले असते. वृत्तांत नमूद केल्याप्रमाणे हाणामारी किंवा राडा या पातळीवरचं कोणतीही घटना नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती संस्कृती नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय चर्चा प्रक्रियेत तीव्र भावना व्यक्त होत असतात. अशा प्रकारे तीव्र भावना वृत्तवाहिन्यांच्या जाहीर चर्चासत्रातही होत असल्याचं आपण पाहतो. मात्र त्याला आपण राडा किंवा हाणामारी असे संबोधत नाही असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

अंतर्गत गटबाजीमुळे मराठवाड्यात राष्ट्रवादीचा पराभव?
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. उस्मनाबाद, परभणी आणि बीडमध्ये राष्ट्रवादीची चांगलीच ताकद आहे. बीडमध्ये पार्टीचे माजी नेता जयदत्त क्षीरसागर भाजपा-शिवसेनाचा सपोर्ट करत होते. परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचे दिसत होते. पण, अंतरगर्त गटबाजीमुळे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे विश्लेषकांचे मत आहे. यावर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावर लिहलेल्या मजकूरांमुळे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

नवीन चेहऱ्यांना संधी
आगामी विधानसभा निवडणुकीला सामारे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. ताज्या दमाच्या नवीन चेहऱ्यांना पक्षात पुढे आणण्याची योजना पक्षनेतृत्वाने आखल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा उमेदवार फक्त एका जागेवर विजयी झाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ११ ते १२ जागांची अपेक्षा होती, पण फक्त पाच जागांवर उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.