जळगाव : केळी उत्पादकांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या येथील कार्यालयावर शेतकऱ्यांनी केळी फेक आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याने तसेच शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला होता. राज्य सरकारने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदालना दरम्यान शेतकऱ्यांनी भाजप विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

मागील आठवडय़ात गारपीट आणि वादळी पावसामुळे जिल्ह्य़ातील रावेर, यावल, फैजपूर भागात केळीबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. रावेर तालुक्यात सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या भागातील नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाहणी करावी आणि अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असतांना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्यांना भेट देणे टाळले, तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धावता दौरा केला. या दरम्यान मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री का आले नाही, असा प्रश्न शेतकरी नेते सोपान पाटील यांनी केल्याने महाजन यांनी अरेरावी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी ट्रॅक्टरमध्ये भरू केळीचे घड जळगावला आणण्यात आले. ते शिवतीर्थ मैदानासमोरील महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर आणून शेतकरी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या कार्यालयावर केळी फेक सुरू केली. या आंदोलनामुळे संपूर्ण रस्त्यावर कच्च्या केळीचा खच पडला होता. यावेळी ‘सरकार हमसे डरती है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनाची माहिती पोलिसांना असल्यामुळे दुपारी १२ वाजेपासूनच महाजन यांच्या कार्यालयाबाहेर दंगा नियंत्रण पथकासह प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आRमक भूमिका घेत शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रोखून धरले. शेतकऱ्यांनी तेथूनच कार्यालयावर केळी फेकली. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली.

शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले असतांना भाजपचे नेते आणि मंत्री राजकारण करण्यासाठी जळगावला येतात, परंतु शेतकऱ्यांची भेट घेत नाहीत, असा आरोप सोपान पाटील यांनी केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, कल्पिता पाटील यांसह इतर नेते उपस्थित होते.