राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रं पाठवण्यात येणार आहेत. या सर्व पत्रांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली असणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर ही पत्रं पाठवण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून मोहीम राबवली जात असून ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्रं पाठवली जाणार आहेत. भाजपाच्या याच मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस व्यंकय्या नायडूंना २० लाख पत्र पाठवून उत्तर देणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी एबीपीशी बोलताना ही माहिती दिली.

उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिली ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा, व्यंकय्या नायडूंनी दिली समज, म्हणाले…

“उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपाच्याच खासदाराला ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापासून रोखलं. यावरुन भाजपाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत हे दिसून आलं. तसंच महाराष्ट्राबद्दल भाजपा नेत्यांच्या मनात किती द्वेष आहे आहे हे दिसतं. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं २० लाख पत्रं पाठवून निषेध केला जाणार आहे,” अशी माहिती मेहबूब शेख यांनी दिली आहे.

सभागृहात नेमकं काय झालं ?
भाजपाचे सदस्य उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, “हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशी नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.