X

महाराष्ट्रातील भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचा ‘कंदील मेणबत्ती’ मोर्चा

सरकारने नियोजन केले नसल्याचाही आरोप

महाराष्ट्रात भारनियमन (लोडशेडिंग) सुरु झाल्याचा निषेध करत राष्ट्रवादीने कंदील-मेणबत्ती मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद येथील शिवाजी चौकात कंदील-मेणबत्ती मोर्चा काढून राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला. सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका जनतेला बसला आहे. याचमुळे दिवाळी ऐन तोंडावर असताना जनतेला अंधारात रहावे लागत आहे, अशी टीकाही यावेळी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.

खरेतर परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडावर हसू फुलले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेण्यासाठीच राज्य सरकारने भारनियमन सुरू केले अशी टीका राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली. रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे लोकांना आणि शेतकऱ्यांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागतो आहे. सरकारने यावर ठोस उपाय योजना करून अंधारातून जनतेला बाहेर काढावे अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

आघाडी सरकारच्या काळात विजेची गरज आणि मागणी यानुसार त्याचे नियोजन केल्यामुळे महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाला होता. मात्र या सरकारने महाराष्ट्र अंधारात नेला अशी टीकाही यावेळी करण्यात आली. तसेच दिवाळीपर्यंत हे संकट दूर करावे अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली.

वीज वापरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि कोळसा उपलब्ध नसल्याने राज्यात तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे. सध्या राज्याला दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट जाणवते आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ऑक्टोबर हिट’मुळे हैराण झालेल्या नागरिकांना महावितरणने दिवाळीच्या तोंडावर हा चटका दिला आहे. याच निर्णयाचा निषेध राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला.

 

  • Tags: loadshedding, ncp,
  • Outbrain