सोलापुरात एकमात्र महापालिकेचीच निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता आपली नजर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाकडे वळविली आहे. ही विधानसभेची जागा काँगेसने राष्ट्रवादीला सोडण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार आग्रह धरण्याचा निर्धार पक्षाच्या बठकीत करण्यात आला. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीसाठी न सोडल्यास याचे विपरीत परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँगेसचा महाबळेश्वर येथे येत्या २६ ऑक्टोबर रोजी मेळावा आयोजिला आहे. या मेळाव्यास सोलापुरातील पक्षकार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीची बठक शिवस्मारक सभागृहात पार पडली. त्या वेळी पक्षाच्या मेळाव्याच्या नियोजनाचा मुद्दा गौण ठरला. तर, शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या जागेचा आग्रह या बठकीत विशेषत्वाने पुढे आला. याच मुद्यावर ही बठक गाजली. पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बठकीस उपमहापौर हारून सय्यद, महापालिकेतील पक्षाचे गट नेते दिलीप कोल्हे, माजी महापौर मनोहर सपाटे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष शंकर पाटील, कय्युम बुऱ्हाण, महिला शहराध्यक्षा अरूणा वर्मा, विजय फुटाणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.     
शहरात विधानसभेची एक जागा राष्ट्रवादीला मिळणे आवश्यक असून त्यासाठी कार्यकत्रे जिद्दीने कामाला लागले आहेत. जर ही जागा मिळाली नाही आणि मित्रपक्ष काँग्रेसने या संदर्भात राष्ट्रवादीला किंमत दिली नाही तर त्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल, असा सडेतोड इशारा शंकर पाटील यांनी दिला. तर माजी महापौर मनोहर सपाटे यांनीही शहर उत्तर विधानसभा मतदार संघ आपलाच होता. या मतदारसंघातून राष्ट्रवादीने दोनवेळा निवडणूक लढविल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा दावा केला. शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी शहरात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विधानसभेची एक जागा राष्ट्रवादीला मिळण्याकरिता महाबळेश्वर येथील मेळाव्यात पक्षश्रेष्ठींकडे जोरदार आग्रह धरणार असल्याचे सांगितले.
सोलापुरात लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणूक समझोत्यात काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे केवळ सोलापूर महापालिकेच्याच निवडणुकीत राष्ट्रवादीला स्वतचे घडयाळ चिन्ह घेऊन मतदारांना सामोरे जावे लागते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मागे फरफटत जावे लागते. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला राष्ट्रवादीच्या बठकीत वाचा फुटली. परंतु विधानसभेची एक जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सुटण्याची सूतराम शक्यता नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. शहरात राष्ट्रवादी एकसंध नसून त्यात मोठया प्रमाणात गटबाजी आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीतील काही मंडळी ‘सुशीलनिष्ठ’ तर काही मंडळी चक्क ‘पंतनिष्ठ’ आहेत. उर्वरित राष्ट्रवादीत शरद पवार गट, अजित पवार गट आणि मोहिते-पाटील गट अशी विभागणी झाल्याचे चित्र दिसून येते.