किसन वीर सातारा साखर कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. किसन वीर साखर कारखान्यावरील ५५० कोटींचे कर्ज, तेथील अनागोंदी कारभार, सध्याची राजकीय परिस्थिती व सध्याची साखर उद्योगाची परिस्थिती विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात येत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले.
किसन वीर कारखान्याची निवडणूक होऊ घातली असून, शनिवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या अनुषंगाने वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. सध्याच्या कारखाना व्यवस्थापनाने ५५० कोटी रुपयांचे कर्ज कारखान्यावर केलेले आहे. सध्या साखर कारखाने अडचणीत आहेत. या कारखाना व्यवस्थापनाने कर्जाशिवाय अनेक ठिकाणांहून आगाऊ उचल घेतलेली आहे. सध्याची राज्य व केंद्र शासनातील राजकीय स्थिती ही साखर उद्योगांना पोषक नाही, या सर्व बाबींचा विचार करून एवढे मोठे कर्ज आणि आगाऊ उचल अंगावर घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यापेक्षा निवडणूक लढवायचीच नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, नितीन भरगुडे पाटील, बाळासाहेब भिलारे, अमित कदम, किरण सावळे पाटील, बकाजीराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
२४ अर्ज दाखल
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत १८ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले. दरम्यान भाजपा आणि शिवसेनेने निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन दिवसात मोठया प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून त्याप्रमाणे ऊस उत्पादक गटनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार सदाशिव पडदुणे व प्रातांधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी दिली. दरम्यान शिवसेना आणि भाजपाने किसन वीर साखर कारखान्याची निवडणूक लढविणार आहे. शिवसेनेचे डी. एम. बावळेकर आणि भाजपाचे पुरुषोत्तम जाधव यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिसे आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, अविनाश फरांदे, विजयाताई भोसले, काशिनाथ शेलार आणि वाई, खंडाळा, सातारा, जावली, कोरेगाव तालुक्यातील कार्यकत्रे उपस्थित होते.