सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे व खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातील वैमनस्य प्राणघातक हल्ल्यापर्यंत वाढले आहे. मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे डोंगरे यांच्या गावी डोंगरे गटाने केलेल्या सशस्त्र प्राणघातक हल्ल्यात मोहिते-पाटील गटाचे सहाजण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डोंगरे व त्यांच्या दोन पुत्रांसह बाराजणांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेटफळ येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेतील भांडणाचा रोष आणि ‘तुम्ही रणजितसिंह मोहिते-पाटील व भाजपचे संजय क्षीरसागर यांच्याबरोबर का फिरता,’ अशा दोन कारणांवरून डोंगरे गटाने  तलवारी, गज, कुऱ्हाड, काठय़ांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन महिलांसह सहाजण जखमी झाले. हल्लेखोरांनी जखमींच्या कुटुंबीयांतील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही लुटून नेले.
याप्रकरणी जखमींपैकी संजय अशोक भांगे (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर सिध्दू डोंगरे व त्यांचे पुत्र राजन डोंगरे व संजय डोंगरे यांच्यासह धनाजी बलभीम डोंगरे, तानाजी बलभीम डोंगरे, बंडू हणमंतु डोंगरे, नाना पोपट डोंगरे, रामलिंग गोविंद भांगे, आप्पा महादेव कदम, दत्ता महादेव कदम, औदुंबर दिंगंबर डोंगरे व पप्पू सदाशिव डोंगरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. या सर्वानी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात संजय भांगे यांच्यासह त्यांचे वडील अशोक दत्तात्रेय भांगे (६५), बहीण सुरेखा प्रकाश गुंड (४५), सुरेश ऊर्फ बबलू प्रकाश गुंड (२४), युवराज प्रकाश गुंड (२५) व मालन बोंबाळे हे जखमी झाले. हल्लेखोरांनी जखमी संजय भांगे यांच्या गळयातील एक लाख १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी तसेच बहीण सुरेखा गुंड यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवजही बळजबरीने लुटून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीत विलास निवृत्ती वागज (४५) व सिध्देश्वर महादेव कदम (३०) हे दोघे जखमी झाले. सर्व जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेटफळ गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेटफळ येथे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रा नुकतीच पार पडली. त्यावेळी लेझीमचा सराव सुरू असताना अग्रभागी उभा राहून लेझीम खेळणाऱ्या युवराज भांगे यास, तू समोर उभे राहायचे नाही, यात्रा संपल्यानंतर तुला बघतो, असा दम देण्यात आला होता. यात्रा संपल्यानंतर युवराज भांगे हा गावात आपल्या घरासमोर रात्री थांबला असताना डोंगरे पिता-पुत्रांसह इतर साथीदारांनी हातात शस्त्रे घेऊन तेथे हल्ला केला. तुम्ही रणजितसिंह मोहिते-पाटील व तसेच भाजपचे संजय क्षीरसागर यांच्याबरोबर का फिरता, असे म्हणून भांगे कुटुंबीयांना व इतरांना बेदम मारहाण करण्यात आली.
सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ असलेल्या शेटफळ गावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून या ना त्या कारणावरून सतत भांडण-तंटे होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीला शाळेतूनच पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. नंतर पुन्हा तिला तिच्या घरी आणून सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यावरूनही एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रत्येक घटनेत मनोहर डोंगरे यांच्या निकटच्या व्यक्तींविरूध्द पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. येत्या १२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष डोंगरे हे पुन्हा इच्छुक आहेत. या पाश्र्वभूमीवर शेटफळ येथे घडलेली ही घटना चर्चेचा विषय ठरला आहे.