भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे ‘तंबाखूमुळे कर्करोग होत नाही’ हे वक्तव्य ऐकून आपल्या ज्ञानात चांगलीच भर पडली. त्यांच्या या ज्ञानामुळे नगर जिल्हय़ाची देशभरात बदनामी झाली. अदानी-अंबानीचे सरकार आले असे आपण ऐकून होतो, परंतु तंबाखू उत्पादकांचेही सरकार आले याची आपल्याला माहिती नव्हती, अशी टीका राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना पिचड यांनी गांधी यांच्यावर सडकून टीका केली. गांधी यांनी कॅन्सरबाबतचे डॉक्टरांचे अहवाल बघावेत, राजकारण करताना माणसांच्या जीवनाशी खेळू नये. तंबाखू किती हानिकारक आहे व त्यामुळे किती नुकसान झाले हे राष्ट्रवादीला चांगलेच माहीत आहे. पक्षाला आर. आर. पाटील यांच्यासारखा नेता अल्पवयातच गमवावा लागला. त्यामुळे तंबाखूपासून व्यसनमुक्ती हवीच असे राष्ट्रवादीचे मत आहे, असे पिचड म्हणाले.
जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीने सुमारे ६० हजार सभासद नोंदणी केली आहे. उद्या, रविवारी सर्व तालुकाध्यक्ष, ६ जिल्हा प्रतिनिधी व ३ प्रदेश प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे, नगर शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षाची निवड १४ एप्रिलला होणार आहे. या निवडी लोकशाही मार्गाने करण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. नगर शहरात किती सभासद नोंदणी झाली, याबद्दल मात्र पिचड यांनी अनभिज्ञता व्यक्त केली.
पक्षांतर्गत निवडी तसेच जिल्हा बँकेसंदर्भात पिचड यांनी दुपारी सरकारी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याला आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, पांडुरंग अभंग, सीताराम गायकर, राजेंद्र फाळके, कैलास वाकचौरे, राजेंद्र गुंड, सोमनाथ धूत, अशोक बाबर, दत्तात्रेय पानसरे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेचा निर्णय अजित पवार घेणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीत गट नाहीत, परंतु काँग्रेसमध्ये मात्र गट आहेत. शिवाय निवडणुकीनंतर जिल्हय़ातील बरीच समीकरणे उलटीपालटी झाली आहेत. पूर्वी कोल्हे, राजळे आमच्याकडे होते, आता नाहीत. आ. राहुल जगताप आमच्याकडे आले आहेत. खरेतर बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण यापूर्वी आणले गेले नाही, असे मधुकर पिचड म्हणाले.
शेलार यांना लवकरच नोटीस!
कुकडी कारखान्याच्या निवडणुकीत घनश्याम शेलार बबनराव पाचपुते यांच्याबरोबर गेले याची गंभीर दखल अजित पवार यांनी घेतली आहे. शेलार यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. पूर्वीच्या चुका परत होणार नाहीत. ज्ञानेश्वर, मुळाप्रमाणेच कुकडीत विजय प्राप्त होईल, असेही पिचड म्हणाले.