अर्थविषयक जाणीव प्रगल्भ होणे ही काळाची गरज असून तसे प्रयत्न शालेय पातळीवरच व्हायला हवेत, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. मिरज येथे विद्यार्थी संघाच्या ८९ व्या वसंतव्याख्यानमालेत त्यांचे शनिवारी ‘राजकारणाचे अर्थराजकारण’ या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना कुबेर म्हणाले की, समाजात अर्थविषयक जाणीव होऊ नये अशी व्यवस्थेचीच नीती असते. जीवनातील संघर्ष करीत असताना अर्थशास्त्र हे कळायलाच हवे. कारण अर्थकारण हा जगण्याचा मूळ पाया आहे. व्यवस्थेकडून सादर होणारा अर्थसंकल्प हा जनतेचे कल्याण करण्यासाठी असतोच असे नाही. जनकल्याण  हा या अर्थसंकल्पाची आडपदास म्हणावी लागेल हे सामान्यांना समजायला हवे ते कळत नाही. एम व्हिटॅमिनमुळे समाजात अर्थ आंधळेपणा आला आहे.
समाजातील अर्थआंधळेपणा दूर करण्यासाठी अर्थजागृतीचे प्रयत्न व्हायला हवेत, मात्र प्रचलित व्यवस्थेकडून ते होत नाहीत.  आमची संस्कृती ही साधी राहणी उच्च विचारसरणी या धर्तीवर असल्याने अर्थविषयक जाणिवा तयार होण्यात अडथळे येतात. आर्य चाणक्यांच्या कालावधीत कर व्यवस्था सक्षम होती. ती आम्ही विसरत चाललो. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नावावर राजकारण करतात. मात्र त्यांची अर्थविषयक जाणीव लक्षात घेतली जात नाही. त्यांच्या कालावधीत कुलाब्याला काढलेली हुंडी दोन दिवसात हैदराबादला वटत होती. इंग्रजांनी राज्याभिषेकावेळी काढलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावल्यानंतर शिवाजीराजांनी सुवर्णरूपात परतफेड करण्यास नकार देत चांदीमध्ये परतफेड करण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी ४८ तासांची मुदत घेतली. मात्र या ४८ तासात स्वराज्यातील चांदीचे भाव दुपटीने वाढविले. या पद्धतीची आíथक जाणीव सध्याच्या राजकारण्यांमध्ये दिसत नाही.
केंद्रीय अर्थमंत्री भारताचा परकीय चलनसाठा ३० हजार कोटी डॉलर्स असल्याचे सांगून पाठ थोपटून घेतात. मात्र चीनची परकीय गंगाजळी ४ हजार ८५० दशलक्ष डॉलर म्हणजे भारताच्या १६ पट आहे. याकडे दुर्लक्ष केले जाते. शासन व्यवस्थेमध्ये असणारा धोरण लकवा हे सुद्धा प्रगतीला मारक आहे. जुनी मूल्ये काळानुरूप बदलण्याची गरज आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक अभियंता भारतात तयार होतात. मात्र केवळ सेवा क्षेत्रातच ते कार्यरत राहतात. त्यांना नवनिर्मितीची स्वप्ने पडत नाहीत आणि त्यांच्याकडे कल्पनारम्यता दिसत नाही हे दुर्दैव आहे. जगातील इतिहास नोंदविणाऱ्या लोकांमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात फार मोठे भवितव्य दडले आहे असे मानणे अपरिपक्वपणाचे लक्षण आहे. भारतीय माणूस मोठी उंची का घेत नाही. बाजाराच्या परिघाचा अंदाज का येत नाही याचा विचार व्हायला हवा.
डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण अवलंबिले, त्यामुळे परदेशी कंपन्यांना भारताची दारे उघडली गेली. या उदारीकरणानंतरच ऐश्वर्या रॉय, युक्ता मुखी सारख्या विश्वसुंदरी उदयाला आल्या. या पाठीमागे भारताची बाजारपेठ हेच मुख्य कारण आहे. रोमन साम्राज्य लयाला गेले त्यावेळी तेथील प्रधानाला मनोरंजनाचे प्रयोग लावण्याचे आदेश होते. त्याच धर्तीवर भारतात रामायण, महाभारतासारख्या मालिका लोकप्रिय झाल्या त्यावेळी अर्थव्यवस्थेचा खडतर काळ सुरू होता. सोने गहाण टाकण्याची वेळ आली होती. हे अर्थशास्त्रीय जाणीव प्रगल्भ झाल्याशिवाय लक्षात येणार नाही असेही कुबेर यांनी सांगितले. व्याख्यानानंतर श्रोत्यांनी अर्थविषयक प्रश्न विचारून निरसन करून घेतले.
प्रारंभी अॅड. चिमण लोकूर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  यावेळी नाना तुळपुळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माजी नगरसेवक मकरंद देशपांडे यांनी आभार मानले. तत्पूर्वी  कुबेर यांनी मिरज विद्यार्थी संघाच्या ग्रंथालयाची व विविध उपक्रमाची माहिती करून घेतली. यावेळी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक हे  ही उपस्थित होते.