सावंतवाडी शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा आणि निसर्गरम्य वातावरण आर्थिकदृष्टय़ा बळकट असल्याने या ठिकाणी पर्यटनवाढ होत आहे असे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी मिनी पर्यटन महोत्सव उद्घाटनप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपालिका मिनी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन इनामदार यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, नगरसेवक राजू बेळ, उमाकांत वारंग, विलास जाधव, सुधन आरेकर, समिती अध्यक्षा साक्षी कुडतरकर, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, शुभांगी सुकी, क्षिप्रा सावंत, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू, गोविंद वाडकर, योगिता मिशाळ आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहर सांस्कृतिक, ऐतिहासिक व निसर्गाच्या दृष्टीने बलस्थान आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने आर्थिक बळकटीचा फायदा सर्वानीच घ्यायला हवा, अशा पर्यटन महोत्सवातून आर्थिक बलस्थान वृद्धिंगत होऊ शकते, असे इनामदार म्हणाले.
नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले, सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची सुरुवात नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. देशभरात या पर्यटन महोत्सवाला नाव मिळाले आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देतानाच कलाकारांना व्यासपीठही उपलब्ध करून देण्यासाठी मिनी पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाते, असे नगराध्यक्ष साळगांवकर म्हणाले.
सावंतवाडी नगरपालिका पर्यटन महोत्सव २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत आहे. तत्पूर्वी २१ डिसेंबपर्यंत मिनी महोत्सव घेऊन कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला जात आहे असे साळगांवकर म्हणाले.

या वेळी मुख्याधिकारी डॉ. द्वासे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी लोककला समूहनृत्य, सोलो रेकॉर्ड डान्स, गायन स्पर्धा व सोलो डान्स विद्यार्थी वर्गासाठी आज घेण्यात आला.