बालवयातच वाचनाची आवड निर्माण केली तर भविष्यातील जीवनाची वाटचाल अधिक संस्कारक्षम होण्यास मदत होते. आपल्या पाल्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करायला हवेत, असे मत अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी कुडाळ येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सिंधुदुर्ग व जिल्हा ग्रंथालय संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सावळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक व कवी प्रवीण दवणे, जि. प. सदस्या जान्हवी सावंत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन वालावलकर, कार्यवाह मंगेश मसके, गजानन प्रभू, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.
सोशय मीडियाच्या जगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी शंका मनात जरूर येते. अशा परिस्थितीतही काही प्रमाणात तरुणवर्ग सोडला तर समाजात वाचन संस्कृती अद्यापही सुस्थितीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते, असे सांगून सावळकर म्हणाले की, साहित्य संमेलन असो किंवा विविध ठिकाणी आयोजित ग्रंथोत्सव असोत, यामधून लाखो रुपयांची होणारी पुस्तकांची विक्री हे वाचन संस्कृती जिवंत असल्याचीच ग्वाही देते. ग्रामीण व शहरी भागात वाचन संस्कृती वाढावी यासाठीच शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्य़ात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जि. प. सदस्या जान्हवी सावंत, गजानन वालावलकर, गजानन प्रभू यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेय गोखले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू विशद केला. समारंभाचे सूत्रसंचालन राजश्री सामंत यांनी केले. शेवटी कार्यवाह मंगेश मसके यांनी आभार मानले.
या समारंभापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा व ग्रंथ ठेवलेल्या पालखीसह नागरिक, कुडाळ हायस्कूल व बॅ. नाथ पै विद्यालयाचे विद्यार्थी यांच्या सहभागाने उत्साही वातावरणात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयापासून या दिंडीचा प्रारंभ होऊन बाजारपेठ मार्गाने ही दिंडी कार्यक्रमस्थळी आणण्यात आली. मुलींचे लेझीम पथक, मुलांचा टाळ्यांच्या गजरातील नृत्याविष्कार, ढोलपथकाच्या गजरात या दिंडीत नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते. ग्रंथोत्सवाच्या बाजूच्या सभागृहात पुस्तक प्रदर्शन व ग्रंथविक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले असून २२ जानेवारीअखेर हे ग्रंथप्रदर्शन सुरू राहणार आहे.