अद्ययावत तंत्रज्ञानाच्या युगातील डिजिटल क्रांतीचा फटका चित्रपट महोत्सवाला बसत आहे. ‘सेल्युलॉईड’वर येणाऱ्या चित्रपटांच्या संख्येवर मर्यादा येत आहे. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) जागितक स्पर्धा विभागासाठी नव्याने नियमावली करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील वर्षीच्या चित्रपट महोत्सवापर्यंत डिजिटल चित्रपटांना सामावून घेण्याच्यादृष्टीने नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल होतील अशी अपेक्षा असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. जागतिक स्पर्धा विभागासाठी राज्य सरकारतर्फे १५ लाख रुपयांचे पुरस्कार दिले जातात. परंतु, स्पर्धात्मक विभागामध्ये प्रवेश घेण्यासाठी चित्रपट ‘३५ एमएम’वरच असला पाहिजे, अशी अट महोत्सवाच्या नियमांमध्ये आहे. डिजिटल क्रांतीमुळे ३५ एमएमवर प्रिंट काढण्याचे प्रकार दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागामध्ये येणाऱ्या चित्रपटांवर काही बंधने आली असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
डीव्हीम्डी आणि हार्ड डिस्कवर चित्रपट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जगामध्ये बहुतांश चित्रपट डिजिटल स्वरुपात उपलब्ध होत असल्यामुळे ३५ एमएम हा प्रकार कमी झाला आहे. त्यामुळे काही चित्रपटांना स्पर्धेऐवजी दुसऱ्या विभागात सहभागी व्हावे लागले. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.