|| मिल्टन सौदिया

पर्यटकांच्या अवाजवी उत्साहाला आवर घालण्याची गरज

वसई : हौस म्हणून बोट भाडय़ाने घेऊन समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या तरुणांपैकी एकाचा बोट उलटून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अशा प्रकारे समुद्रात जाणाऱ्या हौशी पर्यटकांच्या जीवघेण्या अवाजवी उत्साहाला आवर घालण्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. मासेमारीकरिता समुद्रात जाताना नौकेची सर्व मूळ कागदपत्रे शिवाय मच्छीमार असल्याचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असताना वसईत काहीजण बेकायदा भाडय़ाने बोट घेऊन मासेमारी आणि मौजमजेकरिता समुद्रात जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ही बाब सागरी सुरक्षेलाही धोकादायक असल्यामुळे मत्स्यव्यवसाय, पोलीस तथा मेरिटाइम बोर्ड या यंत्रणांनी अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात जाताना मच्छीमारांवर अनेक र्निबध आणण्यात आले आहेत. मच्छीमारांना मासेमारीकरिता जाताना बोटीच्या नोंदणी प्रमाणपत्रासह बोटमालक आणि खलाशांचा विमा, मासेमारी परवाना, नमुना पाच, नमुना दोन, बोटमालकाचे आधारकार्ड, खलाशांचे छायाचित्र अशा सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत घ्याव्या लागतात. शिवाय मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय खात्याकडून बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यात आलेले असते. तेही मासेमारीदरम्यान सोबत ठेवावे लागते. यापैकी एक जरी कागदपत्र कमी असल्याचे आढळून आल्यास १२ सागरी मैलांच्या आत स्थानिक पोलीस आणि त्यापलीकडे तटरक्षक दल त्वरित कारवाई करते.

याशिवाय किनाऱ्यावर मत्स्यव्यवसाय खात्याचा कर्मचारी नियुक्त केलेला असतो. समुद्रात जाताना या कर्मचाऱ्याकडून मच्छीमारांना टोकन घ्यावे लागते. बोटीत किती  माणसे आहेत, किती दिवसांनी बोट येईल याची माहिती द्यावी लागते. उपजीविकेकरिता मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर अशा प्रकारचे र्निबध असताना हौशी पर्यटकांना विनाकागदपत्र समुद्रात जाण्याची मोकळीक कशी काय दिली जाते, असा सवाल आता रानगाव येथील दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी गिरीज येथील काही तरुण स्थानिक मच्छीमारांच्या दोन बोटी घेऊन समुद्रातील पोशापीर येथील खडकावर हौस म्हणून मासेमारीकरिता गेले होते. दुपारी परतीच्या प्रवासावेळी एक बोट लाटेच्या तडाख्याने उलटल्याने या दुर्घटनेत एका तरुणाला प्राण गमवावे लागले.

विशेष म्हणजे ज्या बोटींतून हे तरुण मासेमारीकरिता गेले होते, त्या बोटी नोंदणीकृत नाहीत किंवा त्यांच्याकडे मासेमारीचा कोणताही परवाना नाही. संबंधित तरुणही मच्छीमार नाहीत. असे असतानाही हे तरुण समुद्रात गेल्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणांचा ढिसाळपणाही उघडय़ावर आला आहे. वसईपासून अर्नाळापर्यंतच्या किनारपट्टीतील बराचसा भाग दुपारच्या वेळेस निर्मनुष्य असतो. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी लक्ष ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. ही बाब सागरी सुरक्षेस धोकादायक आहे. बेकायदा मासेमारीस गेलेल्या तरुणांना किनाऱ्यावरच रोखणारी यंत्रणा रानगावच्या किनाऱ्यावर असती तर घडलेली दुर्घटना टाळता आली असती, असे मत आता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

रानगाव येथे खूप कमी प्रमाणात आणि किनाऱ्यावरच बिगरयांत्रिक बोटींनी मासेमारी केली जाते. त्यामुळे तिथे नोंदणीकृत यांत्रिक बोटी नाहीत. पर्यटकांनी समुद्रात जाताना सागरी सुरक्षेला बाधा येईल किंवा जिवावर बेतेल, अशी कोणतीही आततायी कृती करू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. – राजेश पाटील, परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभाग, वसई