भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्विप कार्यक्रम राबविला जातो. तसेच नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात.
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.
मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करावयास हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती त्यांना उपलब्ध करून दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी होऊन मतदारयादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती मिळू शकते.
निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र तयार करण्याची विशेष मोहीम राबविली. मात्र अशा मोहिमेत ‘शासनाचे काम’ अशा पद्धतीने याकडे लक्ष न देता देशाप्रतीचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेस आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करून न थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतात. यात मतदार जनजागृतीपर रॅली, प्रभात फेरी, विविध स्वरूपाच्या स्पर्धा यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यात येतो.
मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरूपाची जागृती घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून नवीन मतदारांना समारंभपूर्वक छायाचित्र मतदार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदान दिनाचे समावेशात्मक आणि गुणात्मक निवडणूक सहभाग हे घोषवाक्य आहे. या निमित्ताने विविध मतदारजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे उपक्रम यशस्वी करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात सहभागी व्हायला हवे आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज व्हायला हवे. असे रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाने आवाहन केले आहे.

मतदान हा महत्त्वाचा अधिकार
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे आवश्यक
BJP Show of Power nagpur
नागपुरात भाजपचे शक्ती प्रदर्शन; गडकरी, पारवे अर्ज भरणार