मराठी रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी सातत्याने लिहिणारे द्रष्टे नाटककार निर्माण होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यापीठीय स्तरावर नाटय़लेखन कार्यशाळांचे नियमितपणे आयोजन केले जावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाटय़शास्त्र अधिविभागातर्फे ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
रंगभूमी टिकण्यासाठी लेखन करणाऱ्यांत तसेच प्रयोग सादर करणाऱ्यांत सातत्याचा अभाव असल्याचे निरीक्षणही डॉ. देशपांडे यांनी नोंदवले. ते म्हणाले, दमदार लिहिणारे युवक आजही आहेत. त्यांची विषयांची निवडही वास्तववादी आहे, पण काळाच्या प्रवाहात ते पुढे कुठे लुप्त होतात, ते समजत नाही. हा सातत्याचा अभाव रंगभूमीला मारक आहे. लेखनात ताकद असेल, तरच ती भूमिका कलाकारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. आज तसे दिसत नसल्याने पुन:पुन्हा पाहायला भाग पाडणारी नाटकंही कमी होत चालली आहेत. गेल्या दहा वर्षांत रंगभूमीशी निगडित स्पर्धाचे अमाप पीक आले आहे. तथापि, त्यांचा पसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा दूरचित्रवाणी व रुपेरी पडद्याकडे जाण्याचे साधन म्हणून वापर केला जातो आहे, हे चित्र चिंताजनक आहे.
कुलगुरू डॉ. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रंगभूमीच्या क्षेत्रातील जागतिक तसेच स्थानिक बदलते प्रवाह समजून घेण्याच्या दृष्टीने ही राष्ट्रीय परिषद अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुरुवातीला शारदास्तवन व दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन झाले. अधिविभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निखिल भगत यांनी आभार मानले, तर आदित्य मंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, डॉ. विश्वनाथ िशदे, डॉ. केशव देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.