राष्ट्रीय इतिहासाचे आतापर्यंत योग्य पद्धतीने चित्रण करण्यात आलेले नाही. महात्मा गांधींसारख्या ठरावीक व्यक्तींनाच स्वातंत्र्य लढय़ातील यशाचे श्रेय देण्यात आले आहे. लोकशाही परंपरेचे पाईक असणाऱ्या लेखकांनी सर्वसमावेशक इतिहासाचे लेखन करून नवीन साहित्य निर्माण करावे, असे आवाहन ज्येष्ठ लेखक व संपादक आनंद हर्डिकर यांनी व्यक्त केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) १७५ व्या वार्षिकोत्सात विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण हर्डिकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
परशुराम साईखेडकर नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमात ललितेतर ग्रंथासाठी डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार मुंबईच्या सुकन्या आगाशे, उमेदीने कथा लिहिणाऱ्यांना देण्यात येणारा डॉ. अ. वा. वर्टी कथा लेखक पुरस्कार नाशिकच्या डॉ. वृंदा भार्गवे, ग. वि. अकोलकर पुरस्कार ठाण्याचे डॉ. दाऊद दळवी तसेच मु. ब. यंदे पुरस्कार लेखक राजीव साने, लघुकथा संग्रहासाठी देण्यात येणारा पु. ना. पंडित पुरस्कार संजीव लाटकर, कादंबरीसाठी धनंजय कुलकर्णी पुरस्कार डॉ. आशुतोष जावडेकर, तर अशोक टिळक पुरस्कार अभिराम भडकमकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी हर्डिकर यांनी सावानाच्या पुरस्कार निवड प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त करत शासनाने ही पद्धती स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. शासकीय कार्यक्रमात सरसकट पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या लेखकाने काय लिखाण केले तेदेखील समजत नाही. या संदर्भात सांस्कृतिक राज्यमंत्र्यांना अवगत केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. वृंदा भार्गवे यांनी विचारांच्या गर्तेत हरवलेला मध्यमवर्गीय तरुण आणि त्याची कुटुंबव्यवस्था केंद्रबिंदू मानून लेखन केल्याचे सांगितले. संजीव लाटकर यांनी कथा-कादंबरी ही गोष्ट नसून ते वैचारिक साहित्य असल्याचे मत मांडले. डॉ. दळवी यांनी साहित्यात मुस्लीम साहित्यकथा दुर्लक्षित राहिल्याचे तर आशुतोष जावडेकर यांनी कवितेच्या तुलनेत कादंबरीचा लेखनकाळ अधिक असल्याने हे लेखन अवघड असल्याचे नमूद केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालनात पुरस्कारार्थीच्या लेखनाचा वेगळ्या शैलीत परिचय करून दिला. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे या वेळी उपस्थित होते.