जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मत
कोकणातील पाणीप्रश्न सोडवायचा असेल तर सामुदायिक विकेंद्रित जलव्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा लागेल, मोठी धरणे बांधण्यापेक्षा लहान-लहान बंधारे बांधण्यावर जोर द्यावा लागेल, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिह यांनी व्यक्त केले. ते कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जलपरिक्रमा आणि जलचेतना परिषदेत बोलत होते. कोकणात दरवर्षी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र नियोजनाआभावी हे पाणी समुद्रात वाहून जाते. परिणामी, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण होते. ही परिस्थिती बदलायची असेल तर कोकणात जलसाक्षरता रुजायला हवी.
राजस्थानमध्ये दरवर्षी सरासरी २०० मिलिमीटर पाऊस होतो, मात्र इथले शेतकरी आत्महत्या करत नाहीत. कोकणातील लोकांसारखे मुंबईसारख्या महानगरात स्थलांतरित होत नाहीत. नसíगक संसाधनांची सुबत्ता असूनही त्यांचा योग्य वापर करणे कोकणातील लोक शिकले नाहीत, ही परिस्थिती बदलली तर कोकण सुजलाम सुफलाम होऊ शकेल, असे मत डॉ. सिंह यांनी व्यक्त केले,
कोकणातील पाणी योजना या ठेकेदारी प्रधान आहेत. ठेकेदार सांगतात, अधिकारी आणि नेते मंजुरी देतात, चुकीच्या पद्धतीने योजना राबविल्या जातात. लोकांच्या हितापेक्षा ठेकेदाराचे हित जपले जाते हेच पाणी समस्येचे मूळ कारण आहे. कोकणाला मोठय़ा धरणांची गरज नाही. तर लहान-लहान धरणांची गरज आहे. यासाठी सामुदायिक विकेंद्रित जलव्यवस्थापन प्रणालीचा स्वीकार करणे गरजेचे आहे.
डोंगर उतारावरून वेगाने धावणारे पाणी अडवा, नंतर धावणारे पाणी चालवा आणि शेवट अडवलेले पाणी जिरवा, पाणी समस्या दूर पळून जाईल, असा मंत्र त्यांनी दिला. शेती आणि हवामान यांची सांगड घातली तर तोटय़ातील शेती फायद्यात येऊ शकते आणि होणारे नुकसानही थांबवता येऊ शकेल. कोकणातून होणारे स्थलांतरण रोखता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडलेल्या जलचेतना परिषदेला कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, आस्वाद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.