महापुरामुळे हानी झालेल्या नगर वाचनालयाला उभारी देण्यासाठी आमदार निधीतून ५ लाखांची मदत करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी बठकीत सांगितले. तसेच पूरबाधित गावातील नुकसानग्रस्त वाचनालयाचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यतील सांगलीवाडी, अंकली, हरिपूर रोड, रामनगर, जुनी धामणी आदी विविध ठिकाणी भेटी देऊन, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी लोकांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थिती व पूरपश्चात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मदत व पुनर्वसन कार्याचा आढावा घेऊन त्या म्हणाल्या, ज्या ठिकाणी अपंग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक पूरबाधित आहेत त्यांना घरी जाऊन मदतीचे वाटप करा. ग्रामीण भागात महिलांच्या कपडय़ाची उपलब्धता होणे आवश्यक असल्याचे सांगून दानशूर व्यक्तींनी प्राधान्याने ही मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जी विविध महामंडळे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून मदत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी महापुराच्या पाश्र्वभूमीवर झालेले नुकसान, पूरपश्चात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, मदत स्वीकृती व वितरण आदींबाबत सविस्तर आढावा सादर केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा आदींबाबत माहिती दिली.