विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा विचार करण्यात येणार असून, शालेय अभ्यासक्रम युगानूकूल करुन आणि यामधून गौरवशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत केले.
विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला सविस्तरपणे उत्तर देताना तावडे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचा पथदर्शक मार्ग सभागृहात मांडला.
त्यांनी सभागृहात केलेल्या घोषणा…
१. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तिसाठी कॅशलेस योजना सुरु करण्यात येईल.
२. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ निवृत्तीच्या दिवशी मिळेल, याची दक्षता शिक्षण खाते घेईल.
३. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी मध्ये सध्या सुरु असलेली निगेटिव्ह मार्कींग पद्धत शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे १९९३ पासून वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय ‘नीट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी पाठविण्यात येतात. परंतु, प्रत्यक्षात देशभरातील विविध विद्यापीठात वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जावून ‘नीट’ मधून मागे घेण्याची विनंती राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. जेणेकरुन महाराष्ट्रात वेद्यकीय प्रवेशासाठी सुमारे ३०० अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकतील.
४. मराठा शाळांच्या बळकटीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
५. राज्यातील सर्व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार दत्तक शाळा योजना सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक आमदाराने एक शाळा दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन प्रत्येक मतदार संघामंध्ये मॉडेल स्कूल निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी केला.
६. विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु करण्यात येतील. या निवडणुकांमधून फक्त राजकीय नव्हे, तर समाजातील अनेक क्षेत्रातील नेतृत्व उभे राहू शकेल.
७. शिक्षण शुल्क कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करणार
८. राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आयआयटी पवई आणि आयआयएम अहमदाबाद यांचे मार्गदर्शन घेणार. जेणेकरुन विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल.