भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळय़ाच्या साक्षीने धनगर समाजाला लोकसभेत किमान ४ जागा देऊ असे सांगितले होते. प्रत्यक्षात मुंडे यांनी धनगर समाजाची उपेक्षा केली. त्याचा निषेध म्हणून सात मतदारसंघांत धनगर समाज नकारात्मक मतदान करणार असल्याचे लोकसंग्राम पक्षाचे प्रमुख अनिल गोटे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
राज्यात धनगर समाजाची संख्या एकूण लोकसंख्येच्या साडेआठ टक्के असून, इतर मागासवर्गीयात क्रमांक एकची संख्या आहे. धनगर समाजाचा केवळ वापर केला जातो. धनगर समाजाचे किमान ४ खासदार लोकसभेत पाठवू, असे मुंडे यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात एकालाही प्रतिनिधित्व दिले नाही. लातूर, नांदेड, सांगली, अहमदनगर, बीड, रावेर व धुळे या मतदारसंघांत आपण धनगर समाजबांधवांना नकारात्मक मतदानाचे आवाहन करणार असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले.
भाजपने केवळ वंजारा समाजाला प्रतिनिधित्व दिले. राज्यातील २६ लोकसभा मतदारसंघांत १ लाख, तर ५६ विधानसभा मतदारसंघांत ३० हजारांपेक्षा अधिक धनगर समाज आहे. एक टक्का मतावर परिणाम झाला, तरीही आपण समाधानी राहणार असल्याचे गोटे म्हणाले. आपण मुंडे यांच्यासोबत प्रामाणिकपणे वागतो त्याचेच आपल्याला हे फळ मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला. याउलट शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्याला चांगली वागणूक दिली असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.