News Flash

बोईसरच्या पादचारी पुलाची रखडपट्टी

सध्या या पुलाच्या खांबांचे वेल्डिंग करण्याचे काम सुरू असून हा पूल पूर्ण होण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

ढिसाळ पद्धतीने काम; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन व तीनवरून पूर्वेकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचे काम १५ डिसेंबपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही हे काम रखडले आहे. रेल्वे प्रशासन या कामाकडे गांभीर्याने पाहात नसून ढिसाळ पद्धतीने हे काम केले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

बोईसरच्या पूर्वेकडील भागात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाची मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत होते. पश्चिमेच्या दिशेकडून फलाट क्रमांक दोन व तीनला जोडणारा पूल उभारण्यात आला असून या फलाटावरून पूर्वेच्या भागाच्या जोडणाऱ्या पुलाचे काम प्रलंबित होते. यासंदर्भात रेल्वेविषयी समस्यांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता या पुलाचे बांधकाम १५ डिसेंबपर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन दिले होते.

सध्या या पुलाच्या खांबांचे वेल्डिंग करण्याचे काम सुरू असून हा पूल पूर्ण होण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पुलाचे काम संथगतीने तसेच योग्य ती सुरक्षितता न बाळगून करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. तसेच हा नियोजित पूल एका सरळ दिशेत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. बोईसर रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या या रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या दोन्ही फलाटांवर पत्र्याचे आच्छादन टाकण्याचे काम प्रलंबित आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मोकळ्या ठिकाणी पत्रे टाकण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या बोईसर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेच्या बाजूला रेल्वे फलाटावरून पूर्वेच्या बाजूला जाण्याकरिता पुलाची व्यवस्था असली तरी या पुलाची उतरण दूर जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक नागरिक, कामगार वर्ग व विद्यार्थी, महिला हे पुलाचा वापर न करता रेल्वेमार्ग ओलांडत असल्याने बोईसर येथे रेल्वे गाडय़ांची धडक बसून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सरकता जिना नाही

बोईसर रेल्वे स्थानकांमध्ये अपंग, वृद्ध व आजारी रुग्णांच्या सोयीकरिता दोन लिफ्ट उभारण्याची तरतूद केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिल्याचे डहाणू-वैतरणा प्रवासी सेवा संस्थेचे पदाधिकारी विजय शेट्टी यांनी सांगितले. बोईसर रेल्वे स्थानकात दररोज हजारो कामगार प्रवास करीत असताना या रेल्वे स्थानकात सरकता जिना (एस्केलेटर) उभारण्याची सध्या तरतूद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने एका प्रश्नाला उत्तर देताना कळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:26 am

Web Title: neglect of railway administration akp 94
Next Stories
1 वाडय़ात बीएसएनएलची सेवा पाच दिवसांपासून ठप्प
2 सरपटणारे प्राणी नागरी वस्तीत
3 धान्यवाटपास शिक्षकांचा विरोध
Just Now!
X