संस्थाचालक व शिक्षकांवर ठपका
मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी गेलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयाच्या संस्थाचालक व शिक्षकांविरोधात मंगळवारी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील ११५ विद्यार्थी १ फेब्रुवारी रोजी सहलीसाठी मुरुड येथे आले होते. दुपारी यातील काही विद्यार्थी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने १८ विद्यार्थी बुडू लागले. त्यातील चार जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. या दुर्घटनेत १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आपल्या मुलांच्या मृत्यूला महाविद्यालय प्रशासनाची हलगर्जी कारणीभूत असल्याचा आरोप पालकांनी केला. त्याप्रमाणे पोलिसांत संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी तगादा लावला होता. मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल व्हावा यासाठी पालकांनी दोनदा प्रयत्नही केले. पोलिसांनी मात्र पालकांच्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद दिला नाही. पालकांनी रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनाही साकडे घातले. परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. हा अपघात नैसर्गिक होता, असा पोलिसांचा दावा होता. अखेरीस त्रस्त पालकांनी मुरुड पोलीस ठाण्यासमोरच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी पालक मुरुड येथे दाखल झाले. पालकांनी पुन्हा एकदा पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती केली. साडेतीन तास चर्चा करूनही पोलीस संस्थाचालक व शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करून घेत नसल्याने पालकांनी अखेरीस उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. अखेर मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर अबेदा इनामदार महाविद्यालयाचे संस्था चालक आणि शिक्षकांविरोधात भादवी कलम ३०४(अ) आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल..
संस्थेचे संचालक पीरपाशा इनामदार,अबेदा इनामदार, लतीफ मगदूम, इरफान शेख, मुजफ्फर शेख, सहलीच्या संयोजक प्रा. शैला बुटवाला, शिक्षक शकीलाबानू अब्दुलवहाब सिद्धवटम, आल्फीया जहागीरदार, जस्मीन अत्तार, समृद्धी सावंत, कविता अग्रवाल, सुमय्या शेख, अर्चना बनसोडे, नमीता मराठे, शिक्षकेतर कर्मचारी रफीक बांगी, हुसेन शेख, अरीफ शेख

पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद होती. सुरुवातीपासूनच ते संस्थाचालकांना पाठिशी घालण्याच्या प्रयत्नात होते. पोलीस अधिक्षकांनीही या प्रकरणी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
– शिवाजी सलगर, तक्रारदार पालक

या प्रकरणात संस्था दोषी आहे की नाही हा तपासाचा भाग आहे. परंतु आलेली तक्रार किमान नोंदवून घ्यायची नाही ही पोलिसांची भूमिका चुकीची आहे. ज्या प्रकरणात १४ जणांचा बळी गेला त्या प्रकरणात पोलीसांनी तक्रारच नोंदवून न घेणे किंवा टाळाटाळ करणे योग्य नाही.
– मतीन मुजावर, शिक्षण हक्क मंच.