मार्च २०१८ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट

गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारी माथेरान मिनी ट्रेन ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालविण्यात आली. यानंतर संपूर्ण नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी पर्यटकांना आणखी चार महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे. संपूर्ण सेवा सुरू करण्यासाठी मार्च २०१८  पर्यंतचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी शुभ्रांशू यांनी बुधवारी माथेरान येथे दिली. त्यासाठी नेरळ ते अमन लॉजपर्यंत रूळ बदलण्याच्या कामासाठी निविदाही काढून कामदेखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जानेवारी ते मे २०१६ दरम्यान माथेरान मिनी ट्रेन मार्गावर काही अपघाताच्या घटना घडल्या. यामधे दोन घटना डबे रुळावरून घसरल्याच्या होत्या. घडलेल्या घटनेत डबे दरीत कोसळण्याच्या बेतात होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेन मे २०१६ पासून बंद करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने नेरळ ते माथेरान मार्गाचा सुरक्षितता अहवाल तयार करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्य रेल्वेने नेरळ ते माथेरान मार्गावर सुरक्षा योजनांचे काम सुरू केले आणि यातील प्रथम अमन लॉज ते माथेरान अशी मिनी ट्रेन सेवा ऑक्टोबर २०१७ पासून सुरू केली. मात्र नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन अशी संपूर्ण सेवा सुरू करण्यात रेल्वेला अपयशच आले.

बुधवारी मिनी ट्रेन मार्गावर करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती मुख्य सुरक्षा अधिकारी शुभ्रांशू यांनी पत्रकारांना दिली. त्यावेळी नेरळ ते माथेरान मार्गाच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. यातील सहा कोटी ७५ लाख रुपये अमन लॉज ते माथेरान मार्गावरील सुरक्षा योजनांसाठी खर्च करण्यात आले असून रुळाच्या बाजूला लोखंडी सुरक्षा तटबंदी, सरंक्षक भिंत यासारखे उपाय करण्यात आले आहेत. या उपाययोजनांनंतर ऑक्टोबर २०१७ च्या अखेरीस मिनी ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. यानंतर नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण सेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी नेरळ ते अमन लॉज मार्गाच्या कामांसाठी ११ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरील रूळ बदलण्यात येणार असून या कामासह अन्य काही कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाही काढून कामाला सुरुवात करण्यात आल्याचे शुभ्रांशू म्हणाले. एकंदरीत कामाची गती पाहता येत्या तीन ते चार महिन्यात नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नेरळ ते माथेरान या २० किलोमीटर मार्गासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सेवा सुरू करण्यात अपयश

जानेवारी ते मे २०१६ दरम्यान माथेरान मिनी ट्रेन मार्गावर काही अपघाताच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेन मे २०१६ पासून बंद करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने नेरळ ते माथेरान मार्गाचा सुरक्षितता अहवाल तयार करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्य रेल्वेने नेरळ ते माथेरान मार्गावर सुरक्षा योजनांचे काम सुरू केले आणि यातील प्रथम अमन लॉज ते माथेरान अशी मिनी ट्रेन सेवा ऑक्टोबर २०१७ पासून सुरू केली. मात्र नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन अशी संपूर्ण सेवा सुरू करण्यात रेल्वेला अपयशच आले.

  • सध्या धावत असलेली अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन सहा डब्यांची आहे. पर्यटकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याने आणखी दोन डबे जोडून ती आठ डब्यांची करण्याचा प्रस्तावही आहे. सध्या दिवसाला ५० ते ६० हजार रुपये उत्पन्न रेल्वेला मिळत आहे.
  • शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची गर्दी खूप गर्दी असते. त्यामुळे स्थानिक आणि काही पर्यटक मिनी ट्रेनच्या सेवेपासून वंचितच राहतात. या सेवेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सध्या एकूण धावत असलेल्या १२ फेऱ्या वाढविण्यात याव्या आणि सहावरून आठ डबे करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक करत आहेत.