21 January 2021

News Flash

नेरधामणा प्रकल्प रखडला

एका तपापासून खारपाणपट्टय़ात नेरधामणा (पूर्णा २) प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे.

खारपाणपट्टय़ातील नेरधामणा सिंचन प्रकल्प

प्रबोध देशपांडे

पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ात वरदान ठरणाऱ्या अकोला जिल्हय़ातील नेरधामणा सिंचन प्रकल्पाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी पंपगृह व बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे एका तपापासून खारपाणपट्टय़ात नेरधामणा (पूर्णा २) प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे.

पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हय़ातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २००८-२००९ मध्ये अनेक प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर खारपाणपट्टय़ातील गावांत सिंचन होण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली. पूर्णा नदीच्या खोऱ्यात अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्य़ांत खारपाणपट्टय़ामुळे कृषी क्षेत्र बाधित आहे.

पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर सुमारे १५ कि.मी. रुंदीचा खारपाणपट्टा पसरलेला आहे. विदर्भाची पूर्व-पश्चिम वाहिनी असलेल्या पूर्णा नदीने ७ हजार ५०० चौ.कि.मी.चे क्षेत्र व्यापले आहे. त्यापैकी ४६९२ चौ.कि.मी. म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र खारपाणपट्टय़ात मोडते. तीन जिल्हय़ांतील १७ तालुक्यांत खारग्रस्त क्षेत्र येते. खारपाणपट्टय़ातील गावांना सिंचनाचा लाभ होण्यासाठी प्रकल्पांना मान्यता देऊन त्याच्या कामांना सुरुवात झाली. त्यामध्ये अकोला जिल्ह्य़ातील नेरधामणासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे. खारपाणपट्टय़ाची जमीन लक्षात घेता या ठिकाणी प्रकल्प उभारून सिंचन करण्याचे काम अवघड स्वरूपाचे आहे. तरी या ठिकाणी नेरधामणा सिंचन प्रकल्प मंजूर करून त्याच्या उभारणीसाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

प्रकल्प खर्चात वाढ

पूर्णा नदीवरील नेरधामणा प्रकल्प धामणा गावाजवळ तापी खोऱ्यात उभारण्यात आला. प्रकल्पाचा पाणीसाठा ८.१७९ द.ल.घ.मी. प्रस्तावित आहे. ६९५४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून भूजल पातळीमध्ये वाढ होईल. पिण्याच्या पाण्यासाठी १.२२ द.ल.घ.मी. आरक्षण आहे. प्रकल्पातील गोड पाण्यामुळे व त्याच्या वापरामुळे काही भागांतील खारेपणा कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज लावण्यात आला आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत १८१.९९ होती. त्यानंतर प्रकल्पाच्या किमतीत संकल्पचित्रातील बदल, अधिक दराने निविदा स्वीकृती, इतर खर्चातील सन २०१०-११ मध्ये दरसूचीवर आधारित ६३८.३४ कोटी रुपयाच्या किमतीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

२०१८-१९ मध्ये द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर नेरधामणा प्रकल्पाची किंमत ८८८.८१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रकल्पाचे बांधकाम ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावा अकोला पाटबंधारे विभागाने केला. प्रकल्पाचे ३० कोटी रुपयांचे पंपगृहाचे काम बाकी आहे. प्रकल्पांतर्गत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन प्रस्तावित आहे. त्या प्रणालीचेही ११४ कोटी रुपयांचे काम अद्याप झालेले नाही. आतापर्यंत प्रकल्पावर ६५५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम व केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेतही प्रकल्पाचा समावेश आहे.

आता जून २०२२ पर्यंत महत्त्वाकांक्षी नेरधामणा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्याच्या नियोजनानुसार काम झाले तरी प्रकल्प निर्माणाचा एकूण कालावधी १४ वर्षांचा होणार असल्याचे चित्र आहे.

प्रकल्पाच्या किमतीत पाचपटीने वाढ

खारपाणपट्टय़ातील नेरधामणा प्रकल्पाच्या मूळ किमतीत सुमारे पाचपटीने वाढ झाली आहे. प्रकल्प उभारणीच्या कार्यात विविध कारणांमुळे दिरंगाई झाली. त्यामुळे प्रकल्पाच्या किमतीचा आकडा सातत्याने फुगला. सध्या प्रकल्पाची किंमत ८८८.८१ कोटी आहे.

नेरधामणा प्रकल्पात पाणीसाठा

नेरधामणा प्रकल्प पूर्णत्वास येणे बाकी असले तरी या ठिकाणी अकोला पाटबंधारे विभागाने मोठय़ा जिकिरीने पाणीसाठा केला. २८ सप्टेंबर २०१९ मध्ये सर्वप्रथम नेरधामणामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात करण्यात आली. ८ ऑक्टोबर २०१९ ला १०० टक्के प्रकल्प भरला होता. या वर्षीही पाणीसाठय़ाचे नियोजन आहे.

इतर प्रकल्पांचे काम पूर्ण

अकोला जिल्हय़ातील नया अंदुरा, कवठा, शहापूर बृहत व पोपटखेड टप्पा-२ या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पाणीसाठा करण्यात आला, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. नदीवरील एका पुलाची उंची कमी असल्याने कवठा प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा करण्यात आला आहे.

नेरधामणा प्रकल्पाचे ९९ टक्के काम झाले असून पंपगृह व बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम बाकी आहे. २०२२-२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी निधीची कुठलीही अडचण नाही. प्रकल्पामध्ये पाणीसाठाही करण्यात आला.

– सी.व्ही. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:12 am

Web Title: nerdhamana project stalled abn 97
Next Stories
1 रत्नागिरीत ‘सारी’च्या साथीने चिंता
2 पश्चिम पट्टय़ातील ७०० हेक्टर जमीन ओलिताखाली
3 दाऊदच्या खेड येथील मालमत्तेचा १० नोव्हेंबरला लिलाव
Just Now!
X