लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : रुग्ण वाढीचा वेग सुरूच असल्याने अकोला जिल्ह्याने गुरुवारी सातशेचा टप्पा ओलांडला आहे. आज एकाच दिवशी तब्बल ४६ नवे रुग्ण आढळून आले. एका रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर त्याचा अहवाल पुन्हा सकारात्मक आला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७१२ वर पोहोचली. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १९० करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील रुग्ण वाढीचा वेग अद्यापही मंदावला नाही. त्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा साातत्याने फुगत आहे. जिल्ह्यातील एकूण १९३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १४७ अहवाल नकारात्मक, तर ४६ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ७१२ झाली. आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली. आज सकाळच्या अहवालानुसार ४६ नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये २७ पुरुष व १९ महिला आहेत. त्यातील ११ जण खदान, शहर कोतवाली नऊ, अकोट फैल पाच, तारफैल चार, न्यू तापडिया नगर, लक्कडगंज माळीपूरा येथील प्रत्येकी दोन, तर जठारपेठ, इराणीवस्ती, फिरदोस कॉलनी, श्रेया नगर खडकी, गुलशन कॉलनी, जीएमसी क्वॉर्टर, वाडेगाव, देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट, दिवेकर चौक, शास्त्री नगर, टॉवर चौक, मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत.

शहरात प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान, दुपारनंतर १० जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यातील सात जणांना घरी, तर उर्वरित तीन जणांना संस्थात्मक विलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यात तीन महिला व सात पुरुष आहेत. यात महसूल कॉलनीतील तीन, रामदास पेठ, न्यू राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर तोष्णीवाल ले आऊट, कौलखेड व आदर्श कॉलनीतील प्रत्येकी एक जण आहे. आतापर्यंत एकूण ४८८ जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी दिल्यावर युवक पुन्हा करोनाबाधित
आज सकाळच्या अहवालात सकारात्मक आलेल्या एका रुग्णावर यापूर्वी उपचार करून कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली होती. घरी गेल्यावर त्याला लक्षणे जाणवू लागल्याने पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याचे नमुने घेऊन तपासणी केली असता त्याचा अहवाल आज पुन्हा सकारात्मक आला आहे. हा रुग्ण देशमुख फैल येथील रहिवासी आहे. तो पुन्हा करोनाबाधित आढळून आल्याने त्याला नवीन रुग्ण म्हणून नमूद करण्यात आले नाही. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७१३ ऐवजी ७१२ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाने दिली.