लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढतच असून, रविवारी एकाच दिवशी अकोला जिल्हा कारागृहातील ५० कैद्याांसह तब्बल ९० नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आणखी तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंदही रविवारी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ जणांचे बळी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने पंधराशेचा टप्पा ओलांडून ती १५१० वर पोहचली. वाढती रुग्ण संख्या व मृत्यूदरामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.

अकोला जिल्ह्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच आहे. रविवारी ९० नवे रुग्ण व तीन मृत्यूची नोंद झाल्याने जिल्हा हादरला आहे. २० दिवसांत ४० जणांचा बळी गेल्यानंतर गेल्या दोन दिवसांत एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. आता करोनाबाधितांच्या मृत्यूवर नियंत्रण आले, अशी शक्यता वर्तवली जात असतांनाच आज पुन्हा तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अद्याापही यश आलेले नाही. विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात नोंदवल्या गेले आहेत. आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. दरम्यान, अकोला जिल्हा कारागृहातील आणखी ५० कैद्याांना करोनाची संसर्ग झाल्याचे आज स्पष्ट झाले. या अगोदर २४ जून रोजी कारागृहातील १८ कैद्याांना करोनाची लागण झाली होती. कारागृहात समूह संक्रमणाचा धोका असतांनाच आज मोठ्या संख्येने कैदी रुग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण ६८ कैदी करोनाबाधित झाले असून, त्यांच्यावर कारागृहातच सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रात उपचार सुरू आहेत. कारागृहातील करोनाच्या कहरामुळे इतर ३०० हून अधिक कैद्याांच्याही आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. करोनाबाधित कैद्याांची संख्या वाढत असल्याने वरिष्ठ पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरुवातीपासून कच्चा कैद्याांसाठी इतर ठिकाणी व्यवस्था व इतरही सर्व खबरदारी घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असतांना कारागृहात नेमका करोनाचा शिरकाव झालाच कसा, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला.

जिल्ह्यातील एकूण ३४५ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २५५ अहवाल नकारात्मक, तर तब्बल ९० अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०७५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यात आज सुट्टी देण्यात आलेल्या २८ जणांचा समावेश आहे. दरम्यान, करोनामुळे आणखी तीन रुग्ण दगावल्याचे आज स्पष्ट झाले. शहरातील अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाला २६ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांचा झाला. त्या मृतकाचा करोना सकारात्मक अहवाल आज प्राप्त झाला. बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला १४ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. बार्शीटाकळी येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १६ जून रोजी दाखल करण्यात आले होते. आज सकाळच्या अहवालात करोनाबाधित आढळून आलेल्या ७८ जणांमध्ये कैद्याांव्यतिरिक्त उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व २७ पुरुष आहेत. सायंकाळी आणखी १२ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने आज दिवसभरात एकूण ९० करोनाबाधितांची भर पडली.
ग्रामीण भागातही वेगाने प्रसार
अकोला शहरातील अनेक परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागातून रविवारी रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पातूर, बाळापूर प्रत्येकी सात जण, टेकडीपूरा येथील सहा जण, अकोट, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही करोना संसर्ग वेगाने पसरत आहे.
सर्वाधिक रुग्णांचा विक्रम
जिल्ह्यात तब्बल ९० रुग्णांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील एकाच दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद रविवारी झाली. यापूर्वी २७ मे रोजी एकाच दिवसांत ७२ रुग्ण आढळून आले होते. जुना मोडीत निघून आज नवीन विक्रम प्रस्थापित झाला.