औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापनाचे महासंचालक हि. ता. मेंढेगिरी यांची जलसंपदा विभागाच्या सचिवपदी बुधवारी रात्री नियुक्ती झाली. या नियुक्तीने विभागाचा कारभार अधिक पारदर्शक असेल, असा संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मेंढेगिरी यांना या क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जाते. गरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी न घालता थेट निर्णय घेणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जलसंपदा विभागाचा चेहरा पारदर्शक राहील, असा संदेश राज्यातील इतर अधिकाऱ्यांना दिल्याचे मानले जाते.
सिंचनातील वेगवेगळय़ा योजनांतून केवळ गरव्यवहारच होतो, असा समज निर्माण व्हावा असे वातावरण होते. या विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यांना पद्धतशीर बाजूला केले जाते. मेंढेगिरी हे औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक होते. राज्यातील समन्यायी पाणीवाटप कसे असावे, याचा अभ्यास करून कायद्यांमध्ये काय बदल करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. कोणाच्याही दबावाला बळी न पडता काम करणारा व्यक्ती, अशी त्यांची जलसंपदा विभागात ख्याती आहे. गोदावरी खोरे महामंडळातील कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कारभार काही काळ त्यांच्याकडे होता. तेव्हा अनेक ठेकेदारांचे धाबे दणाणले होते. केवळ ठेकेदारांच्या दबावामुळे नंतर तेथे अन्य व्यक्तीची नियुक्ती झाली होती. जलसंपदा विभागातील अनेक घोटाळय़ांची चौकशी त्यांनी केली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे जलसंपदा अधिकाऱ्यांना कोणत्या दिशेने काम होणार, याचे संकेत देण्यात आल्याचे मानले जाते. उद्या (शुक्रवारी) ते लाभक्षेत्र विकास या शाखेचे मुख्य सचिव म्हणून पदभार घेतील.