श्रीरामपूर : पशुसंवर्धन हा शेतीचा आत्मा आहे. त्यात मेंढीपालनाला विशेष महत्त्व आहे. मेंढपाळांसाठी चालते-बोलते एटीएम असलेल्या मेंढय़ांची संख्या चराऊ  कुरणे (क्षेत्र) कमी होत आहे.  त्यात नायलॉनच्या धाग्याने लोकरीचे दर घसरले आहेत. देशभरातील शास्त्रज्ञ त्यामुळे चिंतेत असून यापुढे बंदिस्त मेंढीपालन व्यवसायासाठी मेंढय़ांच्या नवीन जाती विकसित करण्यावर त्यांनी भर दिला आहे.  काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या भागात मेंढीपालन केले जाते. पण मध्यप्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत सत्तर टक्के मेंढीपालन होते. राज्यात सहय़ाद्रीच्या डोंगररांगांतील पश्चिम घाट व कोकणातील डोंगराळ भागात चराऊ  कुरणे जास्त असल्याने पठारावरील शेतकरी त्या भागात मेंढय़ा चरायला नेतात. धनगर समाजाचा त्यात मोठा सहभाग आहे. देशात सहा कोटी दहा लाख मेंढय़ांची संख्या असून सुमारे सहा लाखांहून अधिक लोक या व्यवसायात आहेत. त्यात भटक्या समाजाचा मोठा सहभाग आहे. २००७ मध्ये मेंढय़ांची संख्या ७ कोटी १० लाख एवढी होती. पण ती ९ टक्क्यांनी कमी झाली. येत्या पन्नास वर्षांत चराऊ  जमिनी शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळांपुढे मेंढय़ांच्या चड्डय़ांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

मेंढीच्या मटणाला मोठी मागणी आहे. ४०० रुपये ते ६०० रुपये किलो हे मटण विकते. एका मेंढीपासून चार ते सहा महिन्यांत सुमारे २५ ते २८ किलो मटण मिळते. विशेष म्हणजे काही चांगल्या जातीच्या मेंढय़ा या ३० किलोपर्यंत मटण देतात. या मटणाला सौदी अरेबियात तसेच आखाती देशात विशेष मागणी आहे. २०१६-१७ मध्ये सुमारे १० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मेंढय़ा व त्यांच्या मटणाच्या निर्यातीतून मिळाले. आता मेंढी व शेळ्या, बोकड यांच्या मटणाला मागणी वाढली आहे. या मटणाचा दरडोई वापर वाढत असून पूर्वी महिन्याला ४०० ग्रॅम असलेला वापर हा आता साडेतीन किलोवर पोहोचला आहे. गोवंश हत्याबंदी तसेच कुक्कुटपालन उद्योगात होणारा रासायनिक औषधांचा वापर यामुळे लोक या मटणाऐवजी शेळ्या-मेंढय़ांच्या मटणाकडे अधिक आकर्षित झाले आहेत. वाढलेले उत्पन्न व जीवनशैलीतील बदल यामुळे मेंढय़ाच्या मटणाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मेंढीच्या मांसाच्या विक्रीचा वेग हा मोठय़ा प्रमाणात आहे.

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

मेंढीच्या मांसाबरोबरच दुधालाही मोठी मागणी आहे. मेंढीच्या दुधात सर्वाधिक ७.१ एवढी फॅट असते. शेळी व उंटापेक्षा मेंढीच्या दुधात सर्वाधिक फॅट आहे. विशेष म्हणजे हे दूध बाजारात सेंद्रिय दूध म्हणून मान्यता पावलेले आहे. अनेक आजारांत रुग्णांकरिता त्याला विशेष महत्त्व आहे. मेंढीच्या दुधापासून खवा मोठय़ा प्रमाणात तयार केला जातो. त्याला मिठाई उद्योगात मोठी मागणी आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नाही. गाई व म्हशीच्या दुधाच्या खव्यापेक्षा मेंढीचा खवा याला हलवाई विशेष महत्त्व देतात. मात्र मेंढपाळ हे असंघटित वर्गातील असल्यामुळे त्याचे ब्रॅण्डिंग करून बाजारपेठ निर्माण करता आलेली नाही. आजही राज्यांत अनेक जिल्हय़ात मेंढीच्या खव्यासाठी बाजारपेठा प्रसिद्ध आहेत. नगरची खव्याची बाजारपेठ ही राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध पावलेली आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही.

मेंढीच्या लोकरीलाही मोठी मागणी होती. पूर्वी उष्ण प्रदेशातील लोकरीला ८० ते १०० रुपये किलो दर मिळत होता. तर थंड प्रदेशातील मेंढीच्या लोकरीला ५०० ते ७०० रुपये दर मिळत होता. गरम कपडे, स्वेटर, मफलर, जर्किन आदींकरिता त्याचा वापर होत असे. तर साध्या लोकरीचा वापर कांबळे, घोंगडे, कारपेट यामध्ये केला जाई. पण आता नायलॉनच्या धाग्यामुळे लोकरीची मागणी ही घसरू लागली आहे. आता बाजारात उलनच्या नावाखाली नायलॉनच्या धाग्याची वस्त्रे विकली जात आहेत. त्यामुळे साध्या लोकरीचा दर हा १०० रुपये किलोवरून २० रुपये किलोवर आला आहे. मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे उत्पन्नात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. गाई, म्हशी व कुक्कुटपालन व्यवसायात खासगी क्षेत्रातील कंपन्या उतरल्याने गुंतवणूक वाढली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याही आता त्यात रस दाखवू लागल्या आहेत. मात्र मेंढीपालन व्यवसायात अद्यापही गुंतवणूक आलेली नाही. परंपरागत पद्धतीनेच हा व्यवसाय केला जातो.

एका बाजूला मटण व दुधाला मागणी पण दुसऱ्या बाजूला चराऊ  क्षेत्रच नसल्याने मेंढय़ांची कमी होणारी संख्या हा गंभीर प्रश्न बनत आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी अनुसंधान परिषदेच्या अविकानगर (राजस्थान) येथील केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेच्या वतीने देशपातळीवरील मेंढीसुधार प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मेंढीवरती संशोधन करणारे २० शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते. कृषी अनुसंधान परिषदेचे पशुविज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. जे. के. जेना, साहाय्यक महासंचालक डॉ. आर. एस.गांधी, जयपूर येथील केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अरुणकुमार, राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर्जव शर्मा, कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथ, डॉ. शरद गडाख, डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ.उद्धव भोईटे, डॉ.संजय मंडकमाले, डॉ.योगेश कांदळकर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी आता मेंढीपालनाकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहावे लागेल, असे स्पष्ट केले. कुरणे नाहीशी झाल्याने बंदिस्त मेंढीपालनावर यापुढे भर देण्याची गरज आहे. त्यामुळे तशा जातीच्या मेंढय़ा विकसित करणे, मेंढय़ांचे खाद्य व चारा यावर संशोधन करण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. आता नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी संशोधन क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय शास्त्रज्ञांनी घेतला.

सेंद्रिय अन्नाच्या वाढत्या मागणीमुळे मेंढय़ांना महत्त्व

देशात जीवनशैलीत बदल होत आहेत. लोकांचे उत्पन्न वाढत आहे. फास्ट फूडच्या जमान्यात अधिक प्रोटिन असलेल्या मेंढीच्या दुधाला, मटणाला तसेच तुपाला मोठी मागणी येऊ  घातली आहे. आता कुक्कुटपालन व्यवसायाच्या विकासाला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मेंढीपालन हा व्यवसाय बाजारपेठेची गरज भागवू शकतो. त्याकरिता मेंढपाळांना तंत्रज्ञान तसेच नवीन जातीच्या मेंढय़ा द्याव्या लागतील. मेंढीपालनाच्या पारंपरिक पद्धतीऐवजी नव्या मार्गाचा अवलंब याला संशोधनात विशेष महत्त्व असून शास्त्रज्ञांनी ते आव्हान स्वीकारले पाहिजे.

-डॉ.  जे. के.जेना,

साहाय्यक महासंचालक, कृषी अनुसंधान परिषद, पशुविज्ञान विभाग.

 

गरम कपडय़ासाठी उच्च दर्जाची लोकर हवी

मेंढय़ा व मांसाचा भारत हा मोठा निर्यातदार देश आहे. तरीदेखील गरम व उबदार कपडय़ांसाठी रशियासारख्या देशातून लोकर आयात केली जाते. देशात काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह लडाख या भागात अशा प्रकारची लोकर मेंढय़ांपासून मिळते. उच्च दर्जाची लोकर असलेल्या मेंढय़ांच्या जाती तयार करण्यावर यापुढे संशोधन संस्थांना भर द्यावा लागेल. जागतिक तापमानवाढीमुळे त्याला विशेष महत्त्व आहे. नायलॉनच्या धाग्याची भेसळ रोखून निव्वळ लोकरीपासून शाली, रजई यांची निर्मिती करून ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे. देशात मेंढय़ांच्या ४२ जाती आहेत. पण बंदिस्त मेंढीपालन व दूध, मांस, लोकर या गोष्टी विचारात घेऊन संकरित मेंढय़ांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची गरज आहे.

-डॉ. अरुणकुमार, संचालक, केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था, अविकापूर (जयपूर) राजस्थान.