‘‘माझी पत्नी सुलोचना पाटील हिच्या सहकार्यामुळेच मी सर्व काही केले आहे. तिच्यामुळे मला संसाराकडे लक्ष द्यावे लागले नाही. हिऱ्याच्या कुडय़ा करण्यासाठी मी जे एक लाख रुपये खर्च करणार होतो, तेदेखील तिने मला िहगणे स्त्री शिक्षण संस्थेला देणगी म्हणून द्यायला लावले. तिच्या स्मृतीसाठीच मी आजही मालवणमधील शिक्षणसंस्थांना देणगी दिलेली आहे आणि यापुढेही देत राहणार,’’ असे  उद्गार श्री. श्रीपाद ऊर्फ काकासाहेब पाटील यांनी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने केलेल्या सत्कारप्रसंगी काढले. मालवणमधील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या नियोजित नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभावेळी काकासाहेब पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्या वेळी त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. मालवणमध्ये या संस्थेच्या वतीने सायन्स कॉलेज सुरू होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रसंगी कै. सुलोचना श्रीपाद पाटील कनिष्ठ महाविद्यालय एमसीव्हीसी विभागाच्या फलकाचे काकासाहेब पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. काकासाहेबांनी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतूनच या विभागाची इमारत बांधण्यात आलेली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र तिरोडकर यांच्या देणगीतून साकार झालेल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या विद्यार्थी व विद्याíथनी अशा दोन स्वतंत्र विस्तारित वाचन कक्षाचेदेखील अनुक्रमे श्री. काकासाहेब पाटील व श्री. नारायण परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. रवींद्र तिरोडकर यांच्या देणगीमुळे शक्य झालेल्या विद्याíथनी विश्राम कक्षाचेदेखील श्री. परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मालवण फौंडेशन या संस्थेने दिलेल्या आरओ जलशुद्धीकरण यंत्रणेचेदेखील त्यांनी उद्घाटन केले.  स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या या समारंभामध्ये व्यासपीठावरील श्री. काकासाहेब पाटील, श्री. नारायण ऊर्फ नाना परुळेकर, श्री. आनंदराव चव्हाण, श्री. अविनाश आजगावकर या मान्यवरांचा संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांनी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री. पंतवालावलकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. तसेच कै. आबासाहेब देसाई व कै. बळवंतराव आजगावकर यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीमधील योगदान श्रोत्यांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. काकासाहेब पाटील यांनी सांगितलेल्या कै. सुलोचना पाटील यांच्याबद्दलच्या आठवणींनी सर्व श्रोते भारावून गेले होते. श्री. नाना परुळेकर यांनीदेखील संस्थेला शुभेच्छा दिल्या, तसेच कन्याशाळेतल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनीदेखील आपली बहीण म्हणजेच सुलोचना पाटील यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या. मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. आनंदराव चव्हाण यांनी संस्थेची अशीच प्रगती होत राहो आणि सायन्स कॉलेजमुळे टोपीवाला हायस्कूलच्या सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे, अशी भावना व्यक्त केली. श्री. अविनाश आजगावकर यांनी ‘‘बाळासाहेब, तुम्ही माझ्या वडिलांचे म्हणजेच श्री. बळवंतराव आजगावकर यांचे राहिलेले स्वप्न निश्चितच पूर्ण कराल, अशी खात्री वाटते’’ असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी व्यासपीठावरील इतर मान्यवरांचे स्वागत केले व आभार प्रदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर हेही उपस्थित होते. तसेच पाटील व परुळेकर परिवार, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पाटील, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गावकर, डी एड कॉलेजचे प्राचार्य श्री. प्रभू, तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, एनसीसी व एनएसएसचे सर्व विद्यार्थी, इतर विद्यार्थी वर्ग, संस्थेच्या सर्व विभागांचा शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, मालवणमधील हितचिंतक नागरिक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी गर्ल्स व बॉइज युनिटच्या कॅडेट्सनी पाहुण्यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी, राष्ट्रीय स्तरावरील आंतर विद्यापीठ पोस्टर मेकिंग स्पध्रेचा सुवर्णपदक विजेता विवेक देऊलकर याने कै. सुलोचना पाटील यांची पोट्र्रेट रांगोळी साकारली होती. त्या रांगोळीचे कौतुक म्हणून श्री. श्रीपाद पाटील यांनी व्यासपीठावरून रु. २१,००० चे बक्षीस दिले.