29 January 2020

News Flash

परभणी जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना संधी

प्रस्थापित राजकारण्यांना तडाखा देत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. काही वर्षांपासून सुरू असलेल्या ‘सेटिंग’च्या राजकारणालाच छेद दिला गेला.

| October 22, 2014 01:51 am

जिल्ह्यात प्रस्थापित राजकारण्यांना तडाखा देत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सेटिंग’च्या राजकारणालाच आता छेद दिला गेला. निवडक प्रस्थापितांनी सोयीनुसार राजकारण करायचे आणि नव्या पिढीच्या उदयोन्मुख नेतृत्वाला संपवायचे हा प्रकार फोफावला होता. त्याला मतदारांनी प्रतिबंध घातला.  
निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे सुरेश वरपुडकर, रामप्रसाद बोर्डीकर, सीताराम घनदाट या मातब्बरांना मतदारांनी धूळ चारली. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पक्षनिरपेक्ष हितसंबंध सांभाळण्याचे राजकारण जोमात सुरू होते. आपापल्या ठिकाणी राहून परस्परांना मदत करायची, पक्ष कोणतेही असो. यातून तडजोडीचे राजकारण आकाराला येऊ लागले होते. जिल्ह्यात सर्व प्रस्थापित राजकारण्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही. ज्यांनी वीस-वीस वष्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले अशा वरपुडकर-बोर्डीकरांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी मूलभूत प्रयत्न कोणते केले, असा प्रश्न विचारला जात होता त्याचे उत्तर नव्हते. या दोन नेत्यांच्या मतदारसंघाची दुरवस्था समोर असताना सीताराम घनदाट यांनीही वारंवार अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर गंगाखेड मतदारसंघाचा विकास केला नाही, ही वस्तुस्थिती आहे. याउलट धनशक्तीच्या जोरावर मतदारसंघात जो उच्छाद मांडला. प्रचारादरम्यान पसे वाटप प्रकरणात आमदारांना अटक झाली. त्याची नामुष्की सर्वदूर पोहोचली. गंगाखेड मतदारसंघाची बदनामी झाल्यानंतरही पसेवाटपाचा खेळ सुरूच होता. मतदारांनी वरपुडकर-बोर्डीकरांना तर नाकारलेच, पण घनदाटांनाही घरचा रस्ता दाखवला.
वरपुडकर-बोर्डीकर-घनदाट हे समीकरण लोकसभा निवडणुकीनंतर पक्के झाले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांच्यासाठी या तिघांनीही प्रयत्नांची शर्थ केली. मोदीलाटेत जाधवांचा विजय झाला, पण तिघांनाही भांबळे यांना पराभूत करण्याचे समाधान मिळाले. विधानसभा निवडणुकीत बोर्डीकरांचा सामना पुन्हा भांबळे यांच्याशीच झाला. निवडणुकीच्या काही महिने आधी खासगी साखर कारखान्याच्या उभारणीची तयारी बोर्डीकरांनी चालवली होती. कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचेच यासाठी त्यांनी अक्षरश: जंग जंग पछाडले, पण मतदारांनी बोर्डीकरांना नाकारले. विजय मात्र भांबळे यांचा झाला. लोकसभा निवडणुकीत भांबळे यांच्या पराभवासाठी झटणाऱ्या वरपुडकर, बोर्डीकर, घनदाट या तिघांनाही चारच महिन्यांनंतर आलेल्या या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने झिडकारले. विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, डॉ. राहुल पाटील, मोहन फड हे चौघेही पहिल्यांदाच विधानसभेचे सदस्य झाले आहेत.
प्रचारादरम्यान शरद पवारांनी वरपुडकर, बोर्डीकर, घनदाट या सर्वावरच टोकाची टीका केली. ज्यांनी साखर कारखाने, बँका लुटल्या अशा उमेदवारांना या निवडणुकीत पराभूत करा, असा संदेश मतदारांना दिला. वरपुडकर हे कधी काळी शरद पवारांचे कट्टर समर्थक. जिल्ह्यात राष्ट्रवादीतले ते महत्त्वाचे नेते. १९९८ साली वरपुडकर लोकसभेला निवडून आल्यानंतर पवारांनी काँग्रेस विरुद्ध बंड करून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्या वेळी पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे पहिले खासदार ही वरपुडकरांची ओळख होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादीत जी पक्षांतर्गत धुसफूस कायम असायची त्यात वरपुडकरांचा सहभाग मोठा होता. अजित पवार यांचा वरपुडकरांवर सर्वाधिक राग होता. त्याची परिणती विधानसभा निवडणुकीला त्यांना पक्षाची उमेदवारी न मिळण्यात झाली. राष्ट्रवादीत आपले दोर कापून टाकले आहेत. याचा साक्षात्कार वरपुडकरांना आधीच झाला होता म्हणून त्यांनी काँग्रेसशी संधान बांधले होते. अचानक वरपुडकर हे काँग्रेसचे उमेदवार झाले. जनतेने मात्र वरपुडकरांना सपशेल नाकारले.
 संघर्ष करून राजकारण करूपाहणाऱ्या नव्या दमाच्या तरुण राजकारण्यांना ‘सेटिंग’च्या राजकारणात अनेकदा बळी जावे लागले. शेजारचे नांदेड, लातूर हे जिल्हे विकासाच्या बाबतीत घोडदौड करत असताना परभणी जिल्ह्यातल्या नेतृत्वाने कायम स्वत:च्या राजकारणासाठीच सत्तासंघर्ष केला. स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी आकाशपाताळ एक करणारी माणसे नव्या नेतृत्वाचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करताना दिसतात आणि किमान व मूलभूत विकासाची सुद्धा त्यांना आवश्यकता वाटत नाही. ही बाब गेल्या काही वर्षांपासून चिंता करावी अशी आहे. जिल्ह्यातील मतदारांनी सगळय़ा प्रस्थापितांना धडा शिकवून एका अर्थाने भाकरी फिरवली.

First Published on October 22, 2014 1:51 am

Web Title: new candidate chance in parbhani
Next Stories
1 बीड जिल्हय़ात ११७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
2 खालून पहिले..! २२ उमेदवार तिसऱ्या – चौथ्या क्रमांकावर
3 ‘घडय़ाळी’ टिकटिक बंद, ‘बाण’ घायाळ, इंधनाविना इंजिन!
X