प्रदीप नणंदकर

करोनाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यानंतर विनापरीक्षा पुढच्या वर्षांत विद्यार्थ्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उन्हाळय़ाच्या सुट्टीत अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला जात असल्याने नवा वर्गवाद जन्माला येत असल्याची खंत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.

दहावी वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी वॉट्सअप ग्रुप करून त्यावर तज्ज्ञ मंडळींचे व्हिडीओ टाकले जातात. शहरी भागातील विद्यार्थी डोळय़ासमोर ठेवून ही रचना करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात अनेक पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांना या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. ‘आहेरे व नाहीरे’ हा गट पूर्वापार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘आहेरे व नाहीरे’मध्ये मोठी भिंत निर्माण झाली आहे. करोनाची समस्या जगभर आहे त्यामुळे शिक्षणाच्या अडचणीही जगभर आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही ऑनलाइन शिक्षणाची घाई करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. आपल्याकडे जणू काही आभाळ कोसळेल या विचाराने अशा शिक्षणाची घाई करण्यात येत आहे.

मुळात शिक्षकांना सवय नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण द्यायचे कसे ? यासाठी त्यांना प्रशिक्षित व्हावे लागते. सलग तीन, चार तास मोबाइलवर पाहून अभ्यास करणे हे कोणत्याही दृष्टीने सोयीचे नाही मात्र याबाबतीत शिक्षण विभागाची घाई सुरू आहे. ज्यांच्याकडे सुविधा आहे ती मुले अभ्यासात पुढे जाणार व ज्यांच्याकडे सुविधा नाही ती मागे राहणार. सर्वाना समान शिक्षण या मूलभूत हक्कावरच गदा येते आहे आणि त्यामुळे एक नवी समस्या उभी राहते आहे.

शिक्षक प्रतिनिधी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कालिदा माने यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, वाडीवस्तीवरील व तांडय़ावर शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अडचणीचा कोण विचार करणार? त्यांनी शिक्षणापासून वंचितच राहायचे काय? या सर्व विषयांचा अभ्यास करून याबाबतीत सर्वाना सोबत घेऊन निर्णय होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शिक्षण विभागातील ज्येष्ठ चिंतक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी शिक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे असण्याचे कारण नाही. हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत उपलब्ध व्हायला हवे. ही सोय करून वंचित पुन्हा शिक्षणापासून कायमचे वंचित राहणार नाहीत. शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होणार नाहीत याची काळजी घेत ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यास कुठलीच अडचण नसल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण भागासाठी वेगळ्या प्रारूपाची गरज

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी शासन शहरी भागातील विद्यार्थी डोळय़ासमोर ठेवून विचार करते आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली जात आहे. जे विद्यार्थी आश्रमशाळेत शिक्षण घेतात, ज्यांच्या तांडय़ावर अद्याप वीज नाही, ज्यांचे पालक अशिक्षित आहेत अशांकडे मोबाइल उपलब्ध कसा असेल? या विद्यार्थ्यांनी शिकायचेच नाही का? ते अगोदरच शिक्षणापासून लांब राहिले आहेत. या ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांचे शिक्षणातील अंतर अधिक वाढत जाणार आहे. शिक्षक व विद्यार्थी समोरासमोर असतील तर चेहरे पाहून अडचणी लक्षात येतात. याला जगभर मान्यता आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा वेगळा प्रयोग व शहरी भागात वेगळा प्रयोग करायला हवा. शहरी भागात ऑनलाइन शिक्षण देण्याला कोणाची अडचण नाही. मात्र ग्रामीण भागात सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून शिक्षण सुरू राहिले पाहिजे व सर्वाना समान न्याय मिळेल याची काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सर्वाकडे मोबाइल उपलब्ध असणे ही अडचण तर आहेच शिवाय इंटरनेटची सुविधा सक्षमपणे शहरी भागात नाही. ग्रामीण भागात तर अनंत अडचणी आहेत. शिक्षण विभागाने शिक्षणाचे बारकाईने नियोजन करण्याची गरज आहे. एक ओळीचा अध्यादेश काढून भागणार नाही. ऑनलाइन शिक्षणासाठीची सर्व प्रकारची साधने, यंत्रसामुग्री, आदिवासी, भटके विमुक्त, आश्रमशाळेतील विद्यार्थी अशा सर्वांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली पाहिजे. अजून नियमित शाळा सुरू होण्यास अवधी आहे. तोपर्यंत या सर्व बाबींचा विचार करणारा अभ्यासगट नियुक्त करावा व त्यांनी या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून तो शिक्षण विभागाकडे सादर करावा व त्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाइनच्या नावाखाली अस्तित्वासाठी धडपड

खाजगी विनाअनुदानित मराठी शाळा व सीबीएसई, राज्य अभ्यासक्रमाच्या इंग्रजी शाळा या विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्कावर चालतात. शिक्षकांचे पगारही त्यावरच अवलंबून आहेत. अशा शाळांमध्ये केवळ दहावीपर्यंत नाही तर अगदी पहिली व बालवाडीपासूनही ऑनलाइन शिक्षणाचा पाठपुरावा केला जातो आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे वेतन कसे करायच्या कशा व शाळा चालवायची कशी? ही समस्या त्यांच्यासमोर असल्याने काहीही करा व पैसे मिळवा तरच तुमचे पगार मिळतील असे बजावत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जातो आहे. शहरी भागातील बालवाडीप्रमुखही आपल्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना रोज घरबसल्या ऑनलाइन धडे देतात व त्यातून विद्यार्थी व पालक आपल्या संपर्कातून सुटू नयेत यासाठीची त्यांची धडपड सुरू आहे.