News Flash

त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक पुरोहित विरुद्ध उपरे

साधू-महंत आणि प्रशासन, नाशिकचे वैष्णवपंथीय आणि त्र्यंबकेश्वरचे शैवपंथीय आखाडे यांच्यातील वाद-विवादांमुळे सुरूवात होण्याआधीच चर्चेत आलेल्या

| July 7, 2015 03:38 am

साधू-महंत आणि प्रशासन, नाशिकचे वैष्णवपंथीय आणि त्र्यंबकेश्वरचे शैवपंथीय आखाडे यांच्यातील वाद-विवादांमुळे सुरूवात होण्याआधीच चर्चेत आलेल्या कुंभमेळ्यात स्थानिक आणि उपरे पुरोहित यांच्यातील बेबनावाची भर पडली आहे. सिंहस्थात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांची पूजा-विधी करताना फसवणूक होऊ नये याकरीता त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ सावध झाला असून संघाचे ओळखपत्र असणारे पुरोहितच आपले विधी करत आहेत की नाही, याची खातरजमा करण्याचे आवाहन करणारे फलक उभारण्यात आले आहेत. इतर क्षेत्राप्रमाणे पौरोहित्यात देखील तोतयागिरी सुरू असल्याची तक्रार करत भाविकांच्या मार्गदर्शनार्थ हे फलक लावले गेल्याचे संघाने म्हटले आहे. याआधी त्र्यंबक नगरीत स्थानिक आणि उपरे पुरोहितांमधील वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याची काही उदाहरणे आहेत.
पुरोहित संघाची दक्षता
सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी २५ ते ३० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी नारायण नागबळी व त्रिपिंडी श्राध्द हे विधी केल्यास आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविक वर्षभर हे विधी करण्यासाठी येथे येतात. या पूजेसाठी लागणारा कालावधी, भाविकांची संख्या आणि सिंहस्थ शुभपर्व लक्षात घेऊन साधारणत: तीन महिने उपरोक्त विधी बंद ठेवण्याचा निर्णय पुरोहित संघाने आधीच जाहीर केला आहे. सिंहस्थात विशेष महत्व असणारा ‘सिंहस्थ श्राध्द विधी’ करण्यात येणार आहे. भारतात उज्जन, हरिद्वार व प्रयाग येथेही कुंभमेळा होत असला तरी हा विधी सिंहस्थात केवळ त्र्यंबक येथे होतो, असा दाखला दिला जातो. या कालखंडात भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी संघ खबरदारी घेत आहे.

वाद कोणता?
पुरोहित संघाचे ५७५ सदस्य असून त्यांना बोधचिन्ह असणारे अधिकारपत्र देण्यात आले आहे. बाहेरून आलेले ५० ते ६० पुरोहित पौरोहित्य करतात असा अंदाज आहे. कुंभमेळ्यात उपऱ्या पुरोहितांकडून भाविकांची दिशाभूल होऊ नये म्हणून पुरोहित संघाने फलकांच्या माध्यमातून ओळखपत्र असणाऱ्यांकडून विधी करण्याचे सुचविले आहे.  उपरोक्त विशिष्ट पूजा विधी ते करू शकत नसल्याचे संघाकडून सांगण्यात आले. उपऱ्या पुरोहितांकडून भाविकांची फसवणूक झाल्यास समस्त नगरीतील पुरोहितांविषयी वेगळे मत तयार होऊ शकते, याकडे लक्ष वेधून संघ फलकांचे समर्थन करतो.

बाहेरील पुरोहितांना त्र्यंबकेश्वरमध्ये पौरोहित्य करण्यास बंदी नाही. या परिसराची ज्या धार्मिक विधींसाठी ओळख आहे, त्या पूजा करण्याची सचोटी त्यांच्याकडे नाही. त्यांच्यामार्फत पूजा-विधी केले गेल्यास भाविकांमध्ये वेगळी भावना निर्माण होते. तक्रारी केल्या जातात. अशा प्रकारांमुळे भाविकांची दिशाभूल होऊ नये म्हणून संघाने फलक उभारले आहेत.  बाहेरील पुरोहितांनी घरातील विधी करण्यास आडकाठी नाही.    
– प्रशांत गायधनी, कार्याध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित  संघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 3:38 am

Web Title: new controversy added in kumbh mela dispute
टॅग : Kumbh Mela
Next Stories
1 अपात्र ठरविलेल्या लाभार्थीसाठी राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मोर्चा
2 नगर शहरात अवघे एकोणतीस जिल्हय़ात १ हजार ११६ शाळाबाहय़ मुले
3 एका अधिका-यासह ५ पोलिस निलंबित
Just Now!
X