गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यातील करोनाची परिस्थितीत नियंत्रणात आली असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. दरम्यान, दिवसभरात राज्यात ३ हजार ८११ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर २ हजार ०६४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात राज्यात २ हजार ०६४ जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात १७ लाख ८३ हजार ९०५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तसंच राज्यात सध्या ६२ हडाक ७४३ अॅक्टिव्ह रूग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर ९४.०६ टक्के झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यात एका दिवसात ३२२ रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात ३२२ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ७६ हजार ६५ इतकी झाली आहे. तर याच दरम्यान ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ४ हजार ५७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ लाख ६६ हजार २९७ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये १०२ रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १०२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ७७ जण करोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात एका व्यक्तीटा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९५ हजार ३३३ वर पोहचली असून त्यापैकी, ९१ हजार ८५६ जणांनी करोनावर मात केली आहे.