अकरावीसाठी यंदाच्या वर्षांपासून, तर पुढील शैक्षणिक वर्षांपासून बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे मसुदे जाहीर करण्यात आले आहेत. लवकरच त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.

पाठय़पुस्तक मंडळाने अकरावीसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू होणारा पुनर्रचित अभ्यासक्रम तयार करताना विषयावर क्षमता विधानांची मांडणी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक विषयाची इयत्तावार चढत्या श्रेणीने मांडणी केली आहे.

शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन तसेच पुढील शिक्षण संशोधन उद्योग व्यवसाय यासाठी आवश्यक कौशल्याची पायाभरणी, प्रगल्भ आणि जबाबदार नागरिकत्वाचे भान, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विकास, भारतीयत्वाचा सार्थ अभिमान, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाची जोपासना आणि उच्च शिक्षणासाठीची पूर्वतयारी, या नऊ बाबींवर ही मांडणी केली आहे. पाठय़पुस्तक मंडळाच्या संकेतस्थळावर त्याचे मसुदे जाहीर करण्यात आले आहेत.

पाठय़पुस्तक मंडळांचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबत सांगितले की,  प्रत्येक इयत्तेच्या अखेर आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थी नेमके काय शिकले,याची एक सुस्पष्ट मांडणी करण्याच्या अनुषंगाने क्षमता विधाने तयार करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे.

क्षमता विधानांच्या मसुद्यावर समाजातील जाणकार आणि सर्व संबंधित यांचे अभ्यासपूर्ण अभिप्राय पाठय़पुस्तक मंडळाने मागितला आहे. येत्या १० मेपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर येणाऱ्या अभिप्राय आणि सूचनांचा विचार करून या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.  – डॉ. सुनील मगर, पाठय़पुस्तक मंडळ संचालक