मिलच्या जागेवर बांधकाम कंपनीचा दावा
राज्य शासनाने येथील श्री शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली असताना या मिलच्या जागेवर सुनील मंत्री रिअ‍ॅल्टी लि. या कंपनीने आपला दावा बुधवारी एका प्रकटनाव्दारे जाहीर केला आहे. यामध्ये स्मारकाच्या संभाव्य जागेची मालकी कोणाची यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, राज्य शासनाचा मुखभंग झाला आहे. राज्य शासन व कोल्हापूर महापालिकेने करवीरकरांची घोर फसवणूक केली असून, प्रस्तावित स्मारकाबाबत खुलासा करण्याची मागणी बुधवारी कॉमन मॅन संघटनेने केली आहे.
शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेऊन दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शाहूंच्या स्मारकाची योजना त्वरित अमलात आणण्यात येईल, असे जाहीर केले होते. या घोषणेचे कोल्हापूरच्या जनतेने जोरदार स्वागत केले होते. संभाव्य स्मारकाचे स्वरूप कसे असावे याबाबत सूचनाही सुरू झाल्या होत्या. मात्र, करवीरकरांच्या स्मारकाच्या अपेक्षेला बुधवारी तडा गेला. सुनील मंत्री रिअ‍ॅल्टी या कंपनीच्या वतीने स्थानिक वृत्तपत्रात एक नोटीस प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शाहू मिलची सुमारे १ लाख ५ हजार चौरस मीटर जागा मंत्री रिअ‍ॅल्टीच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे. या मालमत्तेचा दावा उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. तसेच त्याची विक्री गहाण, विकसन करार, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी किंवा अन्य कोणत्याही पध्दतीचे हस्तांतर, कोणत्याही निविदा, करार यामध्ये भाग घेऊ नये. मालमत्ता न्यायालयीन वादात प्रलंबित असून, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ लि. यांच्यासह किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाल्यास तो प्रभावहीन राहिल, असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे.
शाहू मिलच्या जागेचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांनी तेथे शाहू स्मारक उभे करण्याचा मनोदय व्यक्त करणे म्हणजे कोल्हापूरवासियांची घोर फसवणूक आहे, असा आरोप कॉमन मॅन संघटनेने केला आहे.
कोल्हापुरात एखादे आंदोलन उभे राहिले की आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे धोरण या स्मारकाबाबतही दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने शाहू मिलमध्ये होणाऱ्या प्रस्तावित स्मारकाबाबत खुलासा करावा. तसेच स्मारकाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीची शैक्षणिक संस्था उभी करण्यात यावी, अशी मागणी कॉमन मॅनचे बाबा इंदूलकर, जीवन कदम, अमित अतिग्रे आदींनी केली आहे.

वकिलाचा सल्ला का घेतला नाही ?
कोल्हापूर महापालिकेने शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहूंचे स्मारक उभे करण्यात यावे, असा ठराव संमत केला आहे. हा ठराव संमत करण्यापूर्वी त्यांनी महापालिकेचे वकील अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांचा सल्ला का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित करून इंदूलकर यांनी अ‍ॅड. चिटणीस हेच मंत्री रिअ‍ॅल्टीचे वकील असून त्यांनीच नोटीस प्रसिध्दीला दिली असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.