करवीर निवासिनी अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेअंतर्गत धार्मिक विधीेंसाठी मानकरी म्हणून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्यांना निमंत्रित केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेअंतर्गत गेले काही दिवस अनेक धार्मिक विधी सुरू आहेत. या विधींसाठी मानकरी म्हणून अनेकांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. यामध्ये देवस्थान समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे. या समितीवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशावेळी या सदस्यांनाच पूजेत समाविष्ट करून घेतल्याबद्दल टीका होत आहे.
विधीची सुरुवात श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाली. यानंतर एकेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. यामध्ये अखेरच्या टप्प्यात त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्यांना निमंत्रित केले. वास्तविक या सदस्यांवर गैरव्यवहाराचे अनेक आरोप होत आहेत. सध्या या समितीची चौकशी राज्य शासनाच्या विशेष पथकाकडून सुरू आहे. अशा वेळी बदनाम झालेल्या समितीच्या सदस्य व अधिकाऱ्यांना धार्मिक कार्यासाठी पाचारण केल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
एकीकडे देवस्थान समितीचे सदस्य, अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका करायची आणि दुसरीकडे धार्मिक विधीसारख्या पवित्र कार्यक्रमास बदनाम झालेल्यांनाच बोलवायचे, या दुटप्पी भूमिकेमुळे श्रीपूजकही टीकेस कारणीभूत ठरले आहेत. देवस्थान समिती सदस्य व श्रीपूजक हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याने त्यावरील प्रक्रियेचा मुद्दा वादग्रस्त बनला होता. वज्रलेप की रासायनिक प्रक्रिया यावर वादंग उठले. अखेरीस श्रीपूजक व देवस्थान समिती यांची न्यायालयात तडजोड होऊन रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेचे काम औरंगाबादचे पुरातत्त्व विभागाचे पथक करणार होते. या कार्यालयास त्यांच्या केंद्रीय कार्यालयाकडून निधी प्राप्त न झाल्याने रासायनिक संवर्धन प्रक्रियेस दोन दिवस विलंब झाला. त्यावरून करवीर नगरीत वेगवेगळ्या चच्रेला तोंड फुटले. हे पथक दाखल झाल्यानंतर वाद संपुष्टात आला. पथकाकडून सुरू असलेले संवर्धन प्रक्रियेचे काम सेंद्रिय साधनांद्वारे उत्तमरित्या झाल्याचा निर्वाळा तज्ञांनी दिला असल्याने शंकेचे कारण उरलले नाही.