राज्यातील अनेक शाळांना आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला दिवस असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन शाळेत पोहोचले होते. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा पहिला दिवस मात्र खास होता. कारण शाळेत तब्बल 80 वर्षानंतर मुलींना प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी स्वत: महापौर मुक्ता टिळक हजर होत्या. इतकंच नाही तर वर्गाचा तास घेऊन त्यांनी विद्यार्थिनींशी संवादही साधला.

पुण्यातील टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 साली झाली. त्यावेळी या शाळेमध्ये मुले आणि मुलींना एकत्र शिक्षण मिळत होते. मात्र काही वर्षांनंतर म्हणजे 1938 मध्ये कसबा पेठेत अहिल्यादेवी मुलींची शाळा सुरू झाल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देणं बंद करण्यात आले होते. या घटनेला तब्बल 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यंदाच्या वर्षापासून मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.

या निर्णयाचे पुणे शहरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनानी स्वागत देखील केले. ज्या विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला आहे त्यांचे पालक देखील आज शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. या मुलींचे शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केले. मुक्ता टिळक यांनी फळ्यावर सुस्वागतम लिहित मुलींचा पहिला तास घेतला आणि त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आंनद पहायला मिळाला.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली असून या शाळेतील अनेक विद्यार्थिनी देश पातळीवर नाव केले आहे. तसेच सुरुवातीच्या काही वर्ष मुलींना प्रवेश देण्यात आला. आता पुन्हा प्रवेश देण्यास सुरुवात केलं आहे ही चांगली गोष्ट आहे.

डेक्कन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे म्हणाले की, संस्थेने तब्बल 80 वर्षांनंतर मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. इतर शाळांमध्ये मुले आणि मुली एकत्र शिक्षण घेत आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून हा निर्णय कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.